मुंबई - क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला बुधवारची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खानच्या जामीन पत्रावर तब्बल पाच तास सुनावणी झाली. मात्र, वेळे अभावी मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी गुरुवारी ढकलली आहे. यामुळे आर्यनला जेल की बेल हे आज कळणार आहे.
काय म्हणाले एनसीबीचे वकील ..?
ड्रग्ज पार्टीतील कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेला यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली आहे. सोमवारी आर्यन खानचा जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान आर्यन खानचे वकील अॅड. अमित देसाई यांनी एनसीबीला अनेक प्रश्न विचारले होते. मात्र, एनसीबीने रितीसर उत्तर देण्यासाठी न्यायालयाला वेळ मागितला होता. त्यानूसार आज न्यायालयात एनसीबीने उत्तराची प्रत न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यानंतर सुनावणी सुरू झाली. एनसीबीचा वकिलांनी आर्यन खानच्या जामीन अर्जाचा जोरदार विरोध केला आहे. आर्यन खान अशा लोकांचा संपर्कात आहेत, जे बेकायदेशीर खरेदी आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कचा हिस्सा आहे. सद्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहेत, यामुळे या घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर आर्यन खानला जामीन मिळाला तर तो देश सोडून पळण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर पुरावे मिटविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता एनसीबी वकील
अनिल सिंग यांनी व्यक्त केली आहे.
आर्यनच्या वकिलांनी केला दावा -
आर्यन खानचा जामीन अर्जावर एनसीबीचे वकील आणि आर्यन खानचा वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. आर्यन खानचे वकील अॅड. अमित देसाई यांनी न्यायालयात दावा केला की, एनसीबीच्या चौकशीत आर्यनकडे रोख रक्कमही हस्तगत झालेली नाही. त्यामुळे क्रुझवर इतरांकडे सापडलेले हे अमली पदार्थ विकत घेण्याचा, सेवन करण्याचा किंवा ते इतरांना विकण्याचा त्याचा बेत होता या गोष्टीही सिद्ध होत नाहीत. तसेच आर्यनविरोधात एनसीबीनं लावलेल्या कलमांखाली त्याला जास्तीत जास्त एका वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्याआधारावर कायद्याने त्याला जामीन मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा युक्तिवाद अमित देसाईं यांनी न्यायालयात केला आहे.
जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी -
न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेला यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळे अभावी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, इतर आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या जामीन अर्जावर एनसीबीला उद्याच प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, असा आग्रह न्यायालयात धरला असता एनसीबीच्या वकिलांनी त्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे न्यायालयात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. उद्या मुंबई सत्र न्यायालयात परत दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे.
हेही वाचा - Drugs cruise case: आर्यन खानच्या आजचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगातच, जामिनावर उद्या सुनावणी