मुंबई - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमाना घातले आहे. कोरोना विषाणूविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांची भित्तिचित्रे काढून पश्चिम रेल्वेने अनोख्या पद्धतीनं सलामी दिली आहे.
माहीम स्थानकाची भिंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरुवातीला त्याची दुरुस्त करण्यात आली. नंतर पेंटिंगच्या माध्यमातून सौंदर्य वाढविण्यात आले. पश्चिम रेल्वेने सेंट प्लस आर्ट इंडिया फाउंडेशन आणि पेंट कंपनी यांच्या सहयोगाने माहीम रेल्वे स्टेशनवर कोरोना योद्धांची सुंदर चित्रं साकारली आहेत. माहीम रेल्वे स्टेशन मुंबईचे खरे हिरो म्हणजेच कोरोना योद्धा सुंदर पेटिंग्सने सजले आहे.
कोरोना योद्धांसाठी ही आदरांजली आहे. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. कोरोना विषाणू आपल्यासोबत खूप काळ राहणार असल्याने आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे कलाकार राहुल मोर्य यांनी सांगितले.
राज्यात आज(गुरुवार) १ हजार ६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३ हजार ७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.