मुंबई - राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसने हा दिवस 'संकल्प दिन' म्हणून साजरा केला. यावेळी माजी मंत्री सुनील देशमुख आणि माजी आमदार दिलीप बनसोड यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. सोबतच येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनवू, असा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा विश्वास सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित -
काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसने आज 'संकल्प दिन' साजरा केला. यावेळी देशात वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यासोबतच काँग्रेसला महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनवण्याचा संकल्प महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री अस्लम शेख, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री विश्वजित कदम यांच्यासह इतर अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आजच्या दिवसाचे औचित्यसाधून माजी मंत्री सुनील देशमुख यांचादेखील काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी तिरोडाचे माजी आमदार दिलीप बनसोडसह ठाणे जिल्ह्यामधील उल्हासनगर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
'काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करणार' -
'संकल्प दिनी' काँग्रेसमध्ये माजी मंत्री सुनील देशमुख आणि माजी आमदार दिलीप बनसोड यांचा पक्ष प्रवेश झाला. काँग्रेस सोडून गेलेले अनेक जण अजूनही काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्या नेत्यांकडून संपर्क केला जात असल्याचे नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून सांगितले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अशा सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये आणण्याची मोहीम सुरू केली असल्याचेदेखील यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी बोलून दाखवला आहे. तसेच ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाची गुंतागुंत भाजप सरकारने वाढवली असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला.
'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार' -
काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडी सरकार सोबत असला तरी येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते म्हणून आपण त्यांचे हात बळकट केले पाहिजेत, असे वक्तव्य आपल्या भाषणातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार का, याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढवा' -
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना काँग्रेसमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते सत्ता आकर्षणामुळे भाजप पक्षात गेले. मात्र, आता मुळ काँग्रेसी असलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची घरवापसी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वांनी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
'भाजप सरकारने देशाला 20 वर्ष मागे नेले' -
देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर सरकारने घेतलेल्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे देश 20 वर्ष मागे गेला असल्याची टीका प्रभारी एच.के.पाटील यांनी केली. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी राहूल गांधी यांनी केंद्र सरकारला सूचना केल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने बघितले नसल्याने देशात काय परिस्थिती निर्माण झाली, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, अशी टीका केंद्र सरकारवर एच के पाटील यांनी केली. तर तिथेच राज्यात महाविकास आघाडी सरकारने कोविड परिस्थिती अत्यंत योग्यरीत्या हाताळली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पक्षात नवचैतन्य आणण्याचे काम केले आहे. नाना पटोले ज्या पद्धतीने पक्ष वाढीचा काम करत आहेत, ते पाहता राज्यात काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एच.के.पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला.
'काँग्रेसचे जुने दिवस परत आणू' -
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी सुरू झाली आहे. याचा सुतोवाच माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने होत असल्याचे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. पक्ष सोडून गेलेल्या सर्व नेत्यांची घरवापसी झाली तर, पुन्हा एकदा काँग्रेसला जुने दिवस परत येतील, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच राज्याची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातातून गेल्याची खंत त्यांना नेहमीच वाटते. म्हणून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे काम भाजप कडून केले जाते. मात्र, त्यांना चोख प्रत्यूत्तर राज्य सरकार आपल्या कामातून देत असल्याचे यावेळी अशोक चव्हाण यांनी सांगितले.
'नानांच्या नेतृत्त्वात काँग्रेस ताकतवान करा' -
महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्त्व नाना पटोले करत आहेत. यांच्या नेतृत्त्वामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होते आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची ताकद वाढवण्याचे काम आपल्या सर्वांना केले पाहिजे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
हेही वाचा - पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये समन्वय गरजेचा; यंदाही कोल्हापूर, सांगलीला महापुराची धास्ती