मुंबई - मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी झाली आहे. राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना मदत करण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात आतापर्यंत अनेक लोकांचा जीव गेला आहे. पुरात वाहून जाणे आणि दरडीखाली येऊन मृत्यू होणे, तसेच वीज पडून मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. १९६ मृत्यू केवळ वीज पडल्यामुळे झाले आहेत. पाऊस ज्या भागात झाला, त्या ठिकाणी १०० ते १५० मिली पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात १८० टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. १० पैकी ७ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे पंचनामे करताना अडचणी येत आहेत. सध्या १९ टक्के पंचनामे उर्वरित आहेत. गुलाब चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप येत आहे. पुन्हा पंचनामे करण्यात येतील, यामध्ये २२ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
हेही वाचा - पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग.. कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता
- १९ टक्के पंचनामे उर्वरित -
लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, जळगावला मदतीसाठी एनडीआरएफ पथक पाठवण्यात आले आहे. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना रेस्क्यू करण्यात आले. जळगावला एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. या महिन्यात ७१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ९७ जनावरांचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाला आहे. कच्चा घरांची पडझड झाली आहे. १७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून, सरासरी ८१ ट्कके पंचनामे झाले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
- केंद्र सरकारकडे मदतीची मागणी -
मदतीसाठी केंद्र सरकारला सहावेळा पत्र पाठवले आहेत. १९ डिसेंबर २०१९ मध्ये केंद्राला पत्र पाठवले होते. ९३ कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली होते. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी १ हजार ६५ कोटी रुपये मिळावेत, अशी विनंती केली होती. त्यातून २६८ कोटी ५९ लाख रुपये पाठवण्यात आले. पुर्व विदर्भातील पूरपरिस्थितीसाठी दोन प्रकारचे प्रस्ताव होते. पहिला ८१४ आणि दुसरा ९९९ कोटींचा, यातील दुसऱ्या प्रस्तावाचे १५१ कोटी ५३ लाख रुपये प्राप्त झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
हेही वाचा - न्यायालयाने फेटाळला विनंती अर्ज, सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी