मुंबई - राज्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ( Vegetable Price Hike ) आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये आवक घटल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्यांची दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.
अवाक घटल्याचा परिमाण - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई उपनगरात दररोज 30 ते 35 ट्रक भाजीपाला पाठवला जातो. परंतू सध्या आवक घटल्याने व्यापाऱ्यांना 12 ते 15 ट्रक भाजीपाला पाठवावा लागत आहे. तर, गुजरात राज्यात देखील नाशिकमधून दररोज 10 ते 12 ट्रक भाजीपाला पाठवला जातो. मात्र त्यातही घट झाली असून, केवळ चार ते सहा ट्रक भाजीपाला पाठवला जात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. सर्वत्र भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणात आवक कमी आली आहे. त्यांमुळे भाजीपाल्यांला चांगला दर मिळत आहे.
हेही वाचा - Vegetables Rate Hike : पावसामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले; वाचा किरकोळ बाजारातील दर
भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ - राज्याच्या अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. भाज्यांचे ट्रक गरजेपेक्षा कमी पोहोचत असल्याने भाज्यांचे दर कडाडले असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे. आजच्या बाजारभावानुसार प्रत्येक भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.
हेही वाचा - 'राज्य सरकारची उलटी गिनती झाली सुरु..', भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा..
नाशिक किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर - वांगे 80 रुपये किलो, गवार 130 ते 140, वटाणा 150 ते 160 किलो, भेंडी 80 ते 100 किलो, कारले 80 ते 100 किलो, मेथी 50 ते 60 रुपये जुडी, वाल 110 ते 120 किलो, टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो, बटाटा 30 रुपये किलो, पालक 40 ते 50 जुडी, कोथिंबीर 90 ते 100 जुडी, काकडी 50 ते 60 किलो, चवळी 110 ते 120 किलो, घेवडा 130 ते 140 रुपये किलो.
नागपुरातील भाज्यांचे रेट - घरोघरी चवीने खाल्ले जाणारे वांगे २० वरून थेट ८० ते १०० रुपये किलो झाले आहेत तर टमाटर ३० ते ५० रुपये दराने विकले जात आहेत. फुलकोबी १०० रुपये किलो,पत्ताकोबी ८० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो,शिमला मिर्ची ११० रुपये किलो, मेथी १२० ते १५० रुपये किलो,पालक ९० रुपये किलो, तोंडले ११० रुपये किलो, दुधी ७० रुपये किलो, चवळीच्या शेंगा १२० रुपये किलो बिन्स १६० रुपये किलो, गवारीच्या शेंगा १२० रुपये किलो, कोहळ ६० रुपये किलो, दोडके ११० रुपये किलो, रान काटवल २५० ते ३०० रुपये किलो, मिरची ८० रुपये किलो, कोथिंबीर २०० रुपये किलो आणि अद्रक ८० रुपये किलोने विकल्या जात आहे.
पुण्यात आवक कमी - पुण्यामधील डेक्कन भागाच्या भाजी मार्केटमध्ये आज भाज्याचे भाव साधारण 120 ते ८० रुपये किलो होते. मुख्य मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आवक कमी होत्या. त्यामुळे मार्केटमध्येच भाज्यांचे दर महाग होत असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.