मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली आहे. मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याप्रकरणी देशात नुपुर शर्मा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येत आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला - नुपुर शर्मा यांच्या त्या वक्तव्याचे राज्यातही पडसाद उमटले. त्यामुळे गेल्या आठवड्यात शुक्रवारी नमाजनंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. यामुळे काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नुपुर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीला आता जोर येत आहे. आता याच प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली. तसेच मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या नुपुर शर्मा यांना अटक करण्यात यावे, अशी मागणी केली.
भाजपने केलेल्या निलंबनावर समाधानी नाही - मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याप्रकरणी नुपुर शर्मा यांच्याबाबतीत बोलताना ते म्हणाले, नुपूर शर्माला भाजपने निलंबित केलंय, यावर मी समाधानी नाही. हा विषय फक्त मुस्लिम समाजापूरता नाही. मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्यामुळे, त्यांचे नाव घेतल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय झाला आहे. नुपूर शर्माला अटक झालीच पाहिजे. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.
जाणता राजा विरूद्ध भाजप अशी निवडणूक - भारताबाहेर इतर देशात हिंदु मोठ्या संख्येने आहेत. इस्लामिक देशात सुद्धा त्यांची संख्या ही 85 टक्के आहे. जर असे भारतात होत असेल, तर हिंदूची जबाबदारी कशी घेणार? तर राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, ही निवडणूक जाणता राजा विरूद्ध भाजप अशी होती. त्यात काय झाले हे सगळ्यांनाच माहीत आहे.