मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी मोठ्या थाटात इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाडीचे उद्घाटन सोहळा पार पडला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत व्हिक्टोरिया गाडीकरिता पार्किंग आणि चार्जिंगसाठी रितसर जागा उपलब्ध न करून दिल्यामुळे मुंबईकरांना व्हिक्टोरिया गाडीसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी..
मुंबईचे वैभव असलेली व्हिक्टोरिया गाडी दक्षिण मुंबईत पुन्हा धावायला सज्ज आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला असून, सॅनिटायझिंग आणि इतर कामेही आता पूर्ण झालेली आहे. मात्र महापालिकेकडून व्हिक्टोरिया पार्क करण्यासाठी आणि चार्जिंगसाठी एखादी जागा किंवा स्टॅंड उपलब्ध करून देण्याची मागणी कंपनीने केली आहे.
घोडागाडी बंद झाल्याने ज्या व्हिक्टोरिया मालकांचे नुकसान झाले होते, त्यांना नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी ४ लाख रुपये प्रशासनाकडून देण्यात येणार होते. मात्र, इलेक्ट्रिक व्हिक्टोरियाच्या रुपात संबंधित चालकांना पुन्हा रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या प्रकल्पास सहकार्य करावेत असे उबो राईड्जचे म्हणणे आहे.
या आठवड्यात व्हिक्टोरियाची सफारी सुरू होण्याची शक्यता..
या आठवड्यातच व्हिक्टोरियाची सफारी सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या रात्रीच्या वेळी व्हिक्टोरियांची चाचणी सुरू आहे. आठवड्याच्या शेवटी चाचणी पूर्ण होऊन प्रत्यक्षात पर्यटकांना व्हिक्टोरियामध्ये बसता येईल. सध्या व्हिक्टोरियासाठी फक्त दोन प्रकारचे भाडे आकारता येईल. त्यात शॉर्ट ट्रीपसाठी ५०० रुपये, तर लाँग ट्रीपसाठी ७०० रुपये आकारले जातील. परिणामी, एक व्यक्ती असो किंवा सहा व्यक्ती एका ट्रीपचे पूर्ण पैसे भरूनच व्हिक्टोरियाची सफर करता येईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
6 महिन्यानंतर दर बदलणार..
व्हिक्टोरियासाठी असलेले भाडे निश्चितीचा अधिकार शासनाने कंपनीलाच दिला आहे. सहा महिन्यांनंतर कंपनीकडून आकारण्यात येणाऱ्या भाड्यात बदल करायचा की नाही? याचा निर्णय शासनाने राखून ठेवलेला आहे. त्यामुळे तूर्तास तरी ५०० रुपये भरल्याशिवाय पर्यटकांना व्हिक्टोरियाची सफर करता येणार नाही. सहा व्यक्तींसाठी ५०० रुपये भाडे असल्याने व्हिक्टोरियाच्या फेरीसाठी प्रति माणसी ८३.३३ रुपये खर्च होणार आहे.
हेही वाचा : विशेष बातमी : प्रसिद्ध पूर्णानगर पेढ्याला लॉकडाऊनचा फटका; मागणी घटल्याने शेतकऱ्यांवरही संकट