मुंबई - गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकांना खंडणीच्या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. इरफान तावाफ शेख उर्फ जानशीन व इमरान तावाफ शेख अशी दोन आरोपींची नावे असून त्यांनी ओशिवरा परिसरातील एका व्यावसायिकाला एक कोटींच्या खंडणीसाठी धमकावले होते.
मागील काही दिवसांपासून संबंधित व्यावसायिकाला नेपाळमधील व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांकावरून खंडणीची मागणी होत होती. पैसे न दिल्यास किंवा याबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी या व्यापाऱ्याला मिळाली.
आरोपी इरफान हा काही महिन्यांपूर्वी नेपाळला गेला होता. यानंतर भारतात परतताना त्याने नेपाळमधील सीमकार्ड विकत घेतले होते. तसेच इरफानचा भाऊ इमरान हा व्यापाऱ्याकडे कामाला होता. इमरानने तक्रारदारकडे 15 लाख मागितले होते. मात्र पीडित तक्रारदाराने त्याला कामावरून काढले. याचाच राग मनात धरून आरोपी इरफान याने या व्यापाऱयाकडे 1 कोटींची खंडणी मागितली. फोनवर बोलताना त्याने दाऊद गँगचा मेंबर असल्याचा उल्लेख केला. पोलिसांनी तपास करत दोन्ही आरोपींना मीरा रोड येथून अटक केली आहे.