मुंबई - परळमधील के.ई.एम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या दोन अकाउंटंटला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दहा वर्ष या दोन आरोपींनी संस्थेतील माजी अधिष्ठातांच्या बनावट स्वाक्षरीने रुग्णालय प्रशासनाच्या खात्यातून पैसे लाटले आहेत. आरोपींनी रुग्णालयाची रक्कम स्वत:च्या मालकीच्या नावे असलेल्या कंपनीच्या खात्यावर व इतर खात्यांमध्ये वळवल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी केईएमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
११ वर्षात दोन अधिष्ठाता, दोघांच्याही काळात आरोपींचा काळाबाजार
रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात राज्यातल्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र येथे भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आल्याने रुग्णालय प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे. आरोपी रुग्णालय प्रशासनामध्ये अकाउंटंट विभागात काम करत होता. त्याचा हा पैसे लुटीचा काळा धंदा मागच्या 11 वर्षापासून सुरू होता. आरोपीने या काळात रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या बनावट सह्या करून रक्कम लाटली आहे. या अकरा वर्षाच्या काळात डॉ. अविनाश सुपे आणि डॉ. निर्मला रेगे हे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. याच काळात या आरोपींनी रुग्णालय प्रशासनाची पाच कोटी रुपयांची रक्कम विविध बँक खात्यामध्ये वर्ग करून रुग्णालय प्रशासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी भोईवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याची नोंद आहे. एका आरोपीला अटक केली असून दुसरे आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता, प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.