मुंबई - चेंबूर येथील एका खासगी रुग्णालयाच्या चुकीमुळे प्रसूती झालेल्या महिलेला आणि तिच्या 3 दिवसाच्या नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतची बातमी सर्वात आधी 'ई टीव्ही भारत' ने दिली होती. याची दखल घेत आरोग्य विभागाने हे रुग्णालय सील केले आहे. या प्रकरणी रुग्णालयाने हलगर्जीपणा केला का, याची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
![CHEMBUR](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-coron-hospital-sealed-7205149_02042020115640_0204f_1585808800_891.jpg)
चेंबूर नाका येथील साई हॉस्पिटलमध्ये रुग्ण ऍडमिट होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्याला इतर रुग्णालयात हलवण्यात आले. कोरोनाचा रुग्ण आढळून आला तरी त्या रुग्णालयात निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार केले गेले. या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. रुग्णलयातील कोरोनाचा रुग्ण असलेल्या विशेष वॉर्डमध्येच निर्जंतुकीकरण न करताच एका प्रसूती होणाऱ्या महिलेला ठेवण्यात आले. सिझेरियनद्वारे त्या महिलेला बाळ झाले. मात्र, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे त्या प्रसूती झालेल्या महिलेला आणि त्याचा नवजात बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची सर्वात आधी बातमी ई-टीव्ही भारतने दिली होती.
त्यानंतर त्याची गंभीर दखल घेत पालिकेने साई रुग्णालय सील केले आहे. या रुग्णालयातून कोरोनाचा प्रसार झाल्याने तसेच कोरोनाच्या रुग्णाची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली नसल्याने या रुग्णालयाला सील लावण्यात आले आहे. सध्या या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. पुढील काही दिवस हे रुग्णालय बंदच राहणार आहे. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या महिलेला आणि तिच्या बाळावर कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तर या महिलेच्या पतीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
...तर कारवाई होणार -
साई रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण होता. त्याची माहिती पालिकेला देण्यात आलेली नाही. रुग्ण असलेल्या ठिकाणी इतर रुग्णांना ठेवून त्यांच्यावर उपचार केले गेले. त्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाली. यात रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.