मुंबई - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश चिंतेत असतानाच आता शास्त्रज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. मात्र मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका नसणार असल्याचे संशोधन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरने केले आहे. या संदर्भातला रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार तब्बल 80 टक्के मुंबईकर हे कोरोनाच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळं तिसऱ्या लाटेत तुलनेने कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचे सांगितलं आहे. या 80 टक्क्यांमध्ये 90 टक्के जनता ही स्लममध्ये राहणारी आहे तर 70 टक्के जनता ही सोसायटीमध्ये राहणारी असल्याचे सांगितले आहे.
तिसरी लाट सप्टेंबरमध्ये ? -
शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी घातक ठरली होती. दुसऱ्या लाटेचा परिणाम तरुणांवर सर्वाधिक झाला. अशा स्थितीमध्ये कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या या रिपोर्टनुसार भारतात कोरोनाची एंट्री होऊन 17 महिने लोटले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांना कोरोनाची लागण होऊन जे रुग्ण बरे झाले आहेत. त्या बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज या कमी झाल्या असतील. त्यामुळे अशा रुग्णांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका होण्याची शक्यता असल्याचे डॉ. संदीप जुनैजा यांनी सांगितलंय आहे. तसेच ज्या 20 टक्के मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली नाही, अशा 20 टक्के नागरिकांनाच्या लसीकरणावर भर दिली पाहिजे, असं देखील संदीप जुनैजा म्हणाले
तिसऱ्या लाटेवर परिणाम करणारे तीन घटक -
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या या रिपोर्टनुसार, 80 टक्क्यांपैकी तब्बल 10 दहा टक्के नागरिकांना जरी कोरोनाची लागण झाली तर ते रुग्ण पूर्वीच्या ज्या पद्धतीने बरे झाले त्याच मार्गाने ते रुग्ण बरे होणार आहेत. या तिसऱ्या लाटेवर परिणाम करणारे तीन घटक आहेत एक म्हणजे जो नवा व्हेरिएंट आहे डेल्टा प्लस नावाचा त्यावर लस किती प्रभावी आहे आणि त्याच बरोबर राज्यात 60 टक्के निर्बंध शिथिल केले आहेत त्यानंतर होणार गर्दी. लोक कोरोना नियमांचे पालन करतात का, हा देखील महत्त्वाचा घटक असणार आहे.
साधारणपणे सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका संभवतोय. सप्टेंबरच्या अगोदर जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण साधारण 70-95 टक्के यशस्वी ठरल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी असणार असल्याचे जुनैजा म्हणाले.