मुंबई - मुंबईतील सुमारे 2 हजार किमीच्या रस्त्यावर केवळ 927 खड्डे आहेत, असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे 48 कोटींंची तरतूद केली. ती याच 927 खड्यांसाठी का, असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे. मुंबईतील खड्डे हा विषय सध्या गाजत असून, भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी या विषयावर आज (दि. 27 सप्टेंबर) भाष्य करीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला.
मुंबई महापालिकेने खड्ड्याबाबत जे पोर्टल तयार केले. त्यावर केवळ 927 खड्डे असल्याचे नमूद झाले आहे. केवळ खड्डे बुजवण्यासाठी 48 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मग तो या 927 खड्यांसाठीच होता का? असा सवाल ही आमदार आशिष शेलार यांनी केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी सुरू आहे चौकशीत सत्य समोर येईलच.
वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही
मुंबईचे संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यांसमोर कधी असते का, संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का, याचे कारण नवीन पदपथ (फूटपाथ) करायचा विषय आला की फक्त वरळी. सिग्नल आणि लाईटचे खांब सुशोभित करायचे असतील तर वरळी. मुंबईत सर्वत्र ब्रिज आहेत पण पुलाच्या खाबांचे सुशोभीकरण फक्त वरळीत होते. आता थ्रीडी मॅपिंग करायचे आहे तर तेही वरळीत. कोविड सेंटर बनवायचे असेल तर तेही वरळीत. पाण्याचा निचरा करणारे पंप बसवायचे असतील तर मग कलानगर. वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही, असा सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला.
आरोग्य खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी
मंत्री राजेश टोपे यांनी माफी मागून प्रकरण संपणार नाही, ज्या आमच्या विद्यार्थ्यांची ही संधी हुकली त्यांनी केलेली मेहनत, कुटुंबाचा त्याग आणि त्यानंतर त्यांचे झालेले नुकसान याला आरोग्य खाते जबाबदार आहे. काही दलालांना आधीच प्रश्न पत्रिका कशी मिळाली, ती ठराविक लोकांपर्यंत कशी पोहचते, पोलीस यंत्रणेला याबाबत कसे काही कळत नाही, हा सत्तेचा दुरुपयोग नव्हे का, त्यामुळे माफी मागायची आणि पळ काढायचा, असे करता येणार नाही. राजेश टोपे यांच्या खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आरोग्य विभागाच्या परिक्षांवर प्रतिक्रिया दिली.
सहकारी बँकेचे घोटाळे महाराष्ट्रात सर्वात जास्त
महाराष्ट्रात सहकार विभाग हा खूप मोठा आहे. मात्र, सहकार बँकेमध्ये देशात सर्वात जास्त घोटाळे महाराष्ट्रात झाले असल्याचा अहवाल रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिला असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. त्यामुळे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी ईडीकडून होणाऱ्या कारवाईचे शेलार यांनी समर्थन केले.
हेही वाचा - Audio Clip Viral : आरोग्य सेवा भरतीत घोटाळा.. पदासाठी 15 लाखांपर्यंत बोली, ओबीसी नेत्याचा आरोप