मुंबई - तब्बल चार महिन्यानंतर पुढच्या आठवड्यात मुंबईच्या रस्त्यावर व्हिक्टोरिया बग्गी धावणार आहे. त्याच बरोबर आता शनिवार आणि रविवारी अशी विकेन्डला दक्षिण मुंबईत व्हिक्टोरिया बग्गीतून हेरिटेज वॉकसुद्धा पर्यटकांना करता येणार आहे.
विकेन्डलला सेवा सुरु -
व्हिक्टोरिया बग्गी यात काही बदल करत १४ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केले होते. अवघ्या काही दिवसांतच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व्हिक्टोरिया बग्गीचे चाक बंद करण्यात आले होते. कारण लॉकडाउनमुळे सायंकाळी चार वाजल्यानंतर मुंबईकरांना बाहेर पडण्यास बंदी होती. त्यामुळे उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यातच व्हिक्टोरिया सेवा बंद करावी लागली होती. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत उद्याने, हॉटेल, बाजारपेठा सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत. म्हणूनच पुढील आठवड्यात २४ पैकी पहिल्या टप्प्यामध्ये सहा व्हिक्टोरिया पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा उबो राईड्सचे प्रमुख केतन कदम यांनी केली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना शनिवार आणि रविवारी अशी विकेन्डला दक्षिण मुंबईत व्हिक्टोरिया बग्गीतून हेरिटेज वॉक सुरु करण्यात येणार आहे.
या परिसर सुरु होणार हेरिटेज वॉक -
उबो राईड्सचे प्रमुख केतन कदम यांनी सांगितले की. दक्षिण मुंबईत व्हिक्टोरियातून हेरिटेज वॉक सेवा सुरु करणार आहे. सुमारे एका तासाच्या या रपेटमध्ये मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत, सेंट झेवियर्स महाविद्यालय इमारत, बॅलार्ड पियर इस्टेट, काळाघोडा परिसर, प्रिन्स वेल्स म्युझियम, मुंबई विद्यापीठ इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फॅशन स्ट्रीट, ओव्हल मैदान, फ्लोरा फाऊंटन, नरिमन पॉईंट आणि फोर्ट परिसरातील हेरिटेज इमारती पाहता येणार आहे.
प्रति व्हिक्टोरिया तीन हजार रुपये -
एका व्हिक्टोरियामध्ये सहा पर्यटकांना प्रवास करता येणार आहे. त्यात पर्यटकांना छोटी रपेट आणि मोठी रपेट अशा दोन प्रकारच्या रपेट करता येतील. यामध्ये छोट्या रपेटसाठी एकूण ३०० रुपये आणि मोठ्या रपेटसाठी ५०० रुपये मोजावे लागतील. तसेच, व्हिक्टोरिया बग्गीतून मुंबईतील हेरिटेज वॉक करायची असेल, तर, पर्यटकांसाठी दर ठरवण्यात आले आहे. व्हिक्टोरिया बग्गीतून हेरिटेज वॉकसाठी प्रति व्हिक्टोरिया बग्गी तीन हजार रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे. पुढील आठवड्यानंतर ही सेवा सुरु होणार आहे.
टूअरची संकल्पना-
इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीत पर्यटकांसाठी जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच, पर्यटकांना हेरिटेज वास्तूंची माहिती देण्यासाठी ऑडियो टूअरची संकल्पना आहे. ऑडियो टूअरमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, चिनी, स्पॅनिश आणि अरेबिक भाषेत हेरिटेज इमारती व वास्तूंची माहिती दिली जाणार आहे.