मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र एक महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज मुंबईत कोरोनाचे 645 नवे रुग्ण आढळून आले असून, 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 फेब्रुवारीला लोकल ट्रेन सुरू झाल्यानंतर गर्दी वाढल्याने रुग्णसंख्या वाढल्याचा अंदाज आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 645 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 14 हजार 76 वर पोहोचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 417 वर पोहोचला आहे. 309 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 96 हजार 195 वर गेली आहे. मुंबईत सध्या 5608 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 479 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 88 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 073 इमारतीत रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 30 लाख 14 हजार 520 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
या दिवशी झाली कमी रुग्णांची नोंद
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.