मुंबई - आर्यन खान ड्रग्जच्या प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवले आहे. मात्र, याच किरण गोसावी याने परदेशात कामाला लावतो असे सांगून पालघरमधील तरुणांची फसवणूक करून, त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आता आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी हे तरुण करत आहेत.
परदेशात नोकरीच्या नावाने तरुणांची लाखोची फसवणूक
पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांची त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये गोसावी याने दीड लाख रुपये उकळले. उत्कर्ष व आदर्श हे दोन तरुण दोन-तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना किरण गोसावी याची त्यांच्याशी सुरुवातीला फेसबुक वरून मैत्री झाली. उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो असे सांगितल्यानंतर दोघांकडून गोसावी याने दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दोघांनीही गोसावी याच्या के.पी. इंटरप्राईज या बँक खात्यात पैसे दिले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व विजा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व विजा बोगस असल्याचे कळाल्यानंतर या दोघांनाही धक्का बसला.
कारवाईची मागणी
या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी त्यांनी (सप्टेंबर 2019)मध्ये केळवे पोलिसात दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. मात्र, गेल्या दोन वर्षात तत्कालिन पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला नाही. आर्यन खान प्रकरणात टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पाहून आर्यनसोबत सेल्फी फोटोत असलेला व्यक्तीनेच आपली फसवणुक केली आहे हे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी आमच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन दोषीवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या तरुणांनी केली आहे.
हेही वाचा - आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर बुधवारी होणार सुनावणी