मुंबई - दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून, तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ही धक्कादायक घटना घडली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चिंता व्यक्त करत, महिला सुरक्षेसाठी प्राधान्य देण्याची सरकारला विनंती केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील महिला अत्याचाराची घटना ट्विट करत, सरकारने महिला सुरक्षेचा प्राधान्याने विचार करावा व अशा घटना घडू नये यासाठी उपाय योजना कराव्यात असे म्हटले आहे. तसेच या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका तरुणीवर बलात्कार आणि नंतर विष देऊन झालेली हत्येची घटना अतिशय गंभीर आहे. राज्यात महिला अत्याचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. पण, यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत असं आपल्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे.
दोषींवर तातडीने कारवाई करा
या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी.जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून त्या नराधमांना शिक्षा व्हावी.नसत्या गोष्टींत वेळ घालवायचा आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, असे करून चालणार नाही. माझी विनंती आहे, महिला सुरक्षेला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हंटले आहे.