मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. भांडुप येथे अशा प्रकारची कारवाई करण्यास गेलेल्या एका महिला क्लिनअप मार्शलच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून आणि तिला मारहाण करून जखमी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. रोहिणी धोंदे, शोभा धोंदे आणि सीमा भेंनढारे, अशी अटकेतील महिला आरोपीची नावे आहेत.
पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला -
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार भांडुप रेल्वे स्थानक परिसरात विना मास्क फिरणाऱ्या एका महिलेला पालिकेच्या महिला क्लिनअप मार्शल दर्शना चव्हाण यांनी रोखले व जाब विचारला. तसेच, त्यांच्यावर कारवाईचा करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने आणि तिच्या सोबतच्या आणखीन दोन महिला अशा तिन्ही महिलांनी या महिला क्लिनअप मार्शलला धक्काबुक्की करून मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यात रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक जोरात मारला. त्यामुळे महिला क्लिनअप मार्शल गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. क्लिनअप मार्शलवर हल्ला करून तीला जखमी करणाऱ्या रोहिणी धोंदे, शोभा धोंदे आणि सीमा भेंनढारे या तिघींना स्थानिक पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. या तिघींवर सरकारी कामात व्यत्यय आणणे आणि मारहाण याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ लाख नागरिकांवर कारवाई, १० कोटींचा दंड वसूल -
मुंबईत कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांच्या हितासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे सक्तीचे केले आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर २०० रुपयांचा दंड ठोठवण्याचे आदेश आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. यासंदर्भातील परिपत्रक १४ ऑक्टोबर २०२० ला जारी करण्यात आले. २४ प्रभागात कारवाईसाठी पथके नेमण्यात आली. पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक आदी ५०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. सुमारे २१६० क्लिन- अप मार्शल २४ वॉर्डात नेमण्यात आले. आतापर्यंत ४ लाख ८५ हजार लोकांवर पालिकेने कारवाई केली. त्यांच्याकडून १० कोटी ७ लाखाचा निधी वसूल केला आहे.
हेही वाचा -रेखा जरे हत्या प्रकरणात मोठा खुलासा; एका वरिष्ठ पत्रकारानेच दिली होती सुपारी