मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेल्या ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्पाला गती देण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवारी दहा तासाचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा मेगाब्लॉक सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार आहे.
'असा' असणार मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या कामासाठी रविवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ दरम्यान कळवा-मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत कल्याण येथून सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी ते संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटापर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीमी/अर्धजलद उपनगरीय सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाईल. पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचेल.
दहा मिनिटे उशिरा पोहोचतील लोकल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८ ते सायंकाळी ५दरम्यान सुटणाऱ्या आणि सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची उपनगरीय सेवा सकाळी ७ वाजून ३८ मिनिटाची असेल. ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी ६ वाजून २ मिनिटांनी सुटणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसची सेवा
या दहा तासाच्या मेगाब्लॉकमुळे, काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील, परंतु प्रवाशांच्या हितासाठी विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक प्रभावित क्षेत्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना बसची व्यवस्था करण्याचे सूचित करण्यात आले आहे.