मुंबई - मुंबई एक आंतराष्ट्रीय शहर. इथं तुम्हाला अनेक भाषांची, अनेक वर्णाची, पंथाची, अनेक जातींची आणि अनेक धर्माची लोक पाहायला मिळतील. एक काळ होता जेव्हा मुंबई ही कोकणी माणसाची बोलली जायची. पण, या शहराला एक आंतराष्ट्रीय शहर बनवण्यात महाराष्ट्रातील लोकांसोबतच इतर राज्यांतील लोकांचंही मोठं योगदान आहे. यात तेलगू भाषिक देखील मागे नव्हते. मुंबई घडवण्यात तेलगू बांधवांचं नेमकं काय योगदान आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...
200 वर्षांचा इतिहास
साधारण दोनशे वर्षांपूर्वी आताचं तेलंगणा व पूर्वीच्या आंध्रप्रदेशमध्ये दुष्काळ पडल्याने अनेकांचे रोजगार गेले. पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यावेळी अनेकांनी घर सोडली व महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. मुंबईत येऊन त्यांनी ग्रँड रोड या ठिकाणी आश्रय घेतला व रोजगारासाठी मजुरी करू लागले.
मजुरांचा परिसर कामाठीपुरा
कामाठीपुरा हे नाव याच तेलगु स्थलांतरीत मजुरांमुळे मिळालेलं आहे. इथले जाणकार सांगतात की, "आम्ही इथे स्थलांतरित झालो. पोटाच्या प्रश्नासाठी मजुरी करू लागलो. आमचा पूर्ण कष्टकरी समाज होता. त्यावेळी मजुरांना कामाटी म्हटले जायचं म्हणजेच काम करणारी लोक. पुढे याच कामासाठी वरून काम करणाऱ्या लोकांच्या परिसराला कामाठीपुरा हे नाव पडलं."
मुंबई घडवण्यात मोठं योगदान
अखिल पद्मशाली समाज मुंबईचे अध्यक्ष बाल नरसय्या सांगतात की, "मुंबई घडवण्यात आमच्या तेलुगु समाजाचा मोठा वाटा आहे. पूर्वीचे विटी स्टेशन म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन बांधण्यासाठी जे मजूर होते ते सर्व तेलगू भाषेत मजूर होते. सोबतच त्याच्याच बाजूला असलेले बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालय हे बघण्यासाठी सुद्धा जे मजूर होते ते देखील तेलगू भाषेत मजूर होते. मुंबईच्या स्थापत्यशास्त्रत आमच्या तेलगू समाजाचा मोठा वाटा आहे."
सध्याची स्थिती व्यवसाय नाही नोकरी
बाल नरसय्या जी सांगतात की, "आमचा तेलगू समाज हा व्यवसाय किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याकडे फारसा वळत नाही. तेलगु समाज हा मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आहे. शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागणं हेच सुरुवातीपासून तेलगू समाजाचे ध्येय राहिल आहे. तेलगू भाषिकांचा इतिहासच काम करून मजुरी हाच आहे. कदाचित त्यामुळेच असेल अजून देखील आमचा तेलगू समाज व्यवसायाकडे फारसा वळलेला नाही."