मुंबई - महाराष्ट्रातील धुळे येथे काल रात्री पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये तब्बल ९० तलवारी सापडल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दंगली घडविण्याचा कट रचला जात असून महाराष्ट्राला बदनाम केले जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणांमध्ये पोलीस संपूर्ण चौकशी करत असून याची माहिती समोर येईल असेही ते म्हणाले आहेत.
राम कदम यांचा काँग्रेसवर आरोप? - हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या तलवारी राजस्थान मधून आयात केल्या गेल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच यापूर्वीही धुळे आणि औरंगाबादमध्ये तलवारी सापडल्या असल्याने काँग्रेस शासित राज्यांमधून या तलवारी महाराष्ट्रात आणण्यामागे नेमका काय उद्देश आहे? या कटात काँग्रेसचा हात आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - Raj Thackeray's Tweet : महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'- राज ठाकरे
गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का? - धुळ्यात तलवारीचा खच सापडल्यानंतर त्यावर भाष्य करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. एका तलवारीवर कंबोज आणि राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. तर धुळ्यात तलवारीचा खच सापडला आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.