मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात विशेष एनडीपीएस कोर्टाकडून मनीष राजगरिया आणि अविन साहू या दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात हा पहिलाच जामीन असून, व्ही. व्ही. पाटील यांच्या खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मनीष राजगरिया आणि अविन साहू हे क्रूझवरील गेस्ट होते. त्यांना एनसीबीने अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात ११ नंबरचा आरोपी मनीष राजगरियाजवळ २.४ ग्राम गांजा सापडल्याने त्याला अटक केली होती. मनीषचे वकील अजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० हजारांच्या बॉन्डवर त्याला जामीन देण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
- आर्यन खानची आजची रात्र कारागृहातच -
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आजच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्र आर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या जामीन अर्जावर युक्तिवाद होईल. आज दिवसभरात फक्त आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे.
- मुकुल रोहतगींचा युक्तीवाद काय?
मला आज दुपारी जामीन अर्जावरील एनसीबीच्या उत्तराची एक प्रत मिळाली आणि मी एक प्रत्युत्तर दाखल केलं आहे. हे प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आर्यन हा ग्राहक नव्हता. आर्यन खानला विशेष अतिथीच्या रुपात क्रुझवर आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याला प्रतिक गाभा याने आमंत्रित केलं होतं. प्रतिक गाभा हा एक आयोजक आहे. त्याने आर्यन आणि आरोपी अरबाज मर्चंटला आमंत्रित केलं होतं. दोघांना एकाच व्यक्तीने आमंत्रित केलं होतं. ते दोघे एकत्र क्रुझवर गेले होते.
आर्यन खानला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. त्याच्याविरोधात आरोप हा आहे की आरोपी अरबाज मर्चंटसोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. आर्यन विरोधात कट रचला जात आहे. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जात आहे. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला.