मुंबई - मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा हनुमान चालीसा लावा, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते. परंतु, निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. जनता त्याला थारा देणार नाही, अशा शब्दांत सपाचे आमदार अबू आझमी यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर ( MLA Abu Azmi Attack On raj Thackeray ) दिले.
मशिदीपुढे हनुमान चालीसा लावणाऱ्यांचे स्वागत करू - मशिदीवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषणाची तक्रार होत असेल तर गणपती नवरात्री विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का असा सवाल समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू- मुस्लिमांमध्ये भांडण लावून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता त्याला थारा देणार नाही. आम्हाला धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण नको आहे असे आझमी यांनी स्पष्ट केले. तसेच कोणी मशिदीपुढे हनुमान चालीसा लावण्यासाठी येणार असतील तर आम्ही थंड पाणी सरबत देऊन त्यांचे स्वागत करू, असेही आझमी म्हणाले.
गुढीपाडवा मेळाव्याच्या आवाजाची तपासणी करण्याची मागणी - शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाची मर्यादा किती होती? किती ध्वनी प्रदूषण झाले, पोलिसांनी याची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी आझमी यांनी केली आहे. देशात मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशीद आणि मदरशांमध्ये समाज विघातक कृत्य होत असल्याचा आरोप केला. तसेच मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा समोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला. राज्यात काही ठिकाणी याचे पडसाद उमटले.
हेही वाचा - Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत पेट्रोलपेक्षा दुध महाग, एका ब्रेडची किंमत 150 रूपये; परकीय चलन घटले