मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/जलाशयाची चालू वर्षाची ठेका रक्कम भरण्यास तसेच मत्स्य बोटुकली संचयनाची आगाऊ रक्कम भरणे आणि मत्स्य बीज केंद्राची रक्कम भरणे, आदीसह विविध उपक्रमाचा शासकीय भरणा करण्यास सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे मच्छिमारांना दिलासा मिळणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना क्षमतेनूसार मासेमारी करता आलेली नाही. तसेच उत्पादीत मासळीची विक्री करण्यास देखील पुरेसा वाव मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील मच्छिमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.
राज्य शासन मच्छिमार बांधवांच्या पाठीशी - अस्लम शेख
यानुसार,राज्यातील मासेमारीकरता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/जलाशयांची चालू वर्ष सन 2021-22 ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यास, व इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची 10 टक्के आगाऊ रक्कम भरणा करण्यासाठी अंतिम दिनांक 31 मे, 2021 पासून पुढे सहा महिने (दि. 30 नोव्हेंबर, 2021) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्रांची चालू वर्षाची भाडेपट्ट्याची रक्कम भरणा करण्यासाठी देखील सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. संकटकाळात राज्य शासन नेहमीच मच्छिमार बांधवांच्या पाठीशी उभे आहे. या निर्णयामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या राज्यातील मत्स्यव्यवसायिक, मत्स्यव्यवसाय संस्था तसेच मच्छिमारांना दिलासा मिळणार असल्याचं अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - हरवलेले 1 लाख 72 हजार रुपये पोलिसांनी शोधले अवघ्या तीन तासांत, वृद्धाला अश्रू अनावर