मुंबई - राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असतानाच आता डॉक्टरांसमोर एक वेगळीच अडचण उभी ठाकली आहे. ती म्हणजे या आजारावरील इंजेक्शनची टंचाई. 'अँफेटेरीसिन बी' आणि 'इसावूकोनाझोल' या इंजेक्शनचा मोठा तुटवडा देशात-राज्यात निर्माण झाला आहे. वेळेत रुग्णाला इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचा धोका वाढण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. हे इंजेक्शन सरकारने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, आणि रुग्णांना वाचवावे अशी मागणी आता डॉक्टरांकडून केली जात आहे.
रुग्णांचा आकडा वाढताच
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, यात रुग्णांना डोळे, टाळू गमवावी लागते. तर वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतात. इतका गंभीर असा हा आजार आहे. या आजाराचा मृत्युदर 60 ते 80 टक्के आहे. यावरून हा आजार किती गंभीर आहे याची कल्पना येते. दरम्यान हा आजार 40 ते 50 वर्ष जुना आहे. तर देशात-राज्यात या आजाराचे रुग्णही आतापर्यंत खूप कमी आढळत होते. पण कोरोना काळात मात्र या आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनामुक्त मधुमेही रुग्णांना या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले होते.पण त्यावेळी हे प्रमाण कमी होते. दुसऱ्या लाटेत मात्र या आजाराने कहर माजवला आहे. मागील एक-दोन महिन्यांत अशा रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. सरकारच्या चार दिवसांच्या आकडेवारीनुसार म्युकरमायकोसिसचे 2000 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. अजूनपर्यंत म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची कोरोना रुग्णांप्रमाणे सरकारी नोंद होत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांची यात नोंद नाही. तेव्हा या आजाराच्या रुग्णांचा आकडा यापेक्षा कितीतरी जास्त असू शकतो, अशी शक्यता राज्य म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे सदस्य डॉ आशेष भूमकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे. ही वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय असला, तरी कोरोनग्रस्त आणि कोरोनामुक्त रुग्णांची शुगर रोजच्या रोज तपासत ती नियंत्रणात ठेवली, तर महिन्याभरात हा आजार नियंत्रणात येईल असा दावा ही त्यांनी केला आहे. पण आजच्या घडीला या आजारावरील औषधे उपलब्ध होत नसल्याने उपचारात अडचणी निर्माण होत आहेत, असेही डॉ भूमकर यांनी सांगितले आहे.
इंजेक्शनच मिळेनात
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची एक ते तीन वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. त्यात या रुग्णांना अँफेटेरीसिन बी आणि इसावूकोनाझोल ही दोन इंजेक्शन द्यावी लागतात. ही इंजेक्शन दिली तर रुग्ण लवकर बरे होतात, त्यांचा धोका दूर होतो. त्यामुळे ही दोन्ही इंजेक्शन खूप महत्त्वाची आहेत. असे असताना आज ही दोन्ही इंजेक्शनच उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. मुळात हा आजार दुर्मिळ असल्याने, अशा रुग्णांची संख्या खूप कमी असल्याने इंजेक्शनची मागणी कमी होती. त्यामुळे कंपन्याही ठराविक उत्पादन करतात. पण आता दोन महिन्यांत मात्र देशातच नव्हे तर जगभरात पोस्ट कोविड आजारात या आजाराच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. या अनुषंगाने इंजेक्शनची मागणी ही खूपच वाढली आहे. तर उत्पादन कमी असल्याने जगभरात इंजेक्शनचा तुटवडा आहे. हीच परिस्थिती राज्यात असून लवकरात लवकर मुबलक इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची गरज डॉ मिलिंद नवलाखे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, ग्लोबल रुग्णालय यांनी व्यक्त केली आहे. रुग्णाची शस्त्रक्रिया झाली आहे, त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत, पण त्याला इंजेक्शन वेळेत मिळत नसल्याने आमच्यापुढे ही उपचार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाल्याचे डॉ नवलाखे यांनी म्हटले आहे.
रेमडेसिवीर प्रमाणे आता अँफेटेरीसिन बी आणि इसावूकोनाझोलही रुग्णालयातच मिळणार
गंभीर कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जात असून, या इंजेक्शनचा ही मोठा तुटवडा आहे. तर याचा काळाबाजार ही सुरू आहे, या दोन्ही गोष्टी लक्षात घेत रेमडेसिवीर इंजेक्शन केवळ रुग्णालयातच उपलब्ध करून दिले जात आहे. तर या इंजेक्शनच्या वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे आहेत. तेव्हा आता म्युकरमायकोसिसवरील अँफेटेरीसिन बी आणि इसावूकोनाझोल इंजेक्शनसाठी ही आता हीच गाईडलाइन लागू करण्यात आल्याचे डॉ भूमकर यांनी सांगितले आहे. त्यानुसार आता ही दोन्ही इंजेक्शन रुग्णालयातच उपलब्ध होणार असल्याचेही त्यानी सांगितले आहे. दरम्यान या इंजेक्शनचा मुबलक साठा लवकरात लवकर राज्यभर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यानुसार सरकार नियोजन करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
इंजेक्शनवरच लाखोंचा खर्च?
म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला त्याच्या वजनानुसार दिवसाला 6 ते 8 अँफेटेरीसिन बी इंजेक्शन द्यावे लागतात. एका इंजेक्शनची किंमत 5 हजार ते 10 हजार दरम्यान आहे. त्यामुळे दिवसालाच 30 ते 60 हजार रुपयाचे इंजेक्शन एका रुग्णाला लागते. तर हे इंजेक्शन रुग्णाला पुढील 28 दिवस द्यावे लागते. म्हणजेच फक्त इंजेक्शनवरच 5 ते 10 लाख वा त्यापेक्षा अधिक खर्च लागतो आहे, असे डॉ नवलाखे यांनी सांगितले आहे. अँफेटेरीसिन बी इंजेक्शनबरोबरच फायझर कंपनीचे इसावूकोनाझोल इंजेक्शन दिले जात असून, यामुळे रुग्ण लवकर बरे होत असून मृत्यु रोखले जात आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टर इसावूकोनाझोल इंजेक्शनचा ही वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. पण या इंजेक्शनचा ही आज प्रचंड तुटवडा आहे. महत्त्वाचे म्हणजे हे एक इंजेक्शन 11 हजार रुपयांचे असून, पहिले दोन दिवस एका रुग्णाला 6 इंजेक्शन लागतात. तर पुढे बरेच दिवस हे इंजेक्शन द्यावे लागते. या इंजेक्शनला याच नावाच्या गोळ्याचा ही पर्याय आहे. दिवसाला 2 अशा 42 दिवस गोळ्या द्याव्या लागतात. तर या एका गोळीची किंमत 3 ते 4 हजार रुपये इतकी आहे. एकूणच काय तर या आजारावरील उपचार अत्यंत महाग असून, केवळ इंजेक्शनवरच किमान 10 लाख रुपये खर्च होत आहे. एका रुग्णाचा एकूण खर्च 25 ते 30 लाखांच्या घरात जात असल्याचे डॉ नवलाखे यांनी सांगितले आहे. अनेक रुग्ण हा खर्च करण्यास तयार आहेत. पण इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांची आणि आमची ही मोठी अडचण होत आहे. त्यामुळे आता इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी डॉ नवलाखे यांनी सरकारकडे केली आहे.
महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने कालच जाहीर केला आहे. महात्मा फुले जनारोग्य योजनेखाली हे उपचार केले जाणार आहेत. पण या योजनेची मर्यादा दीड लाख रुपये इतकी आहे. मात्र या आजरावरील उपचारासाठी इंजेक्शनच 5 ते 10 लाख रुपयांची लागत असल्याने, दीड लाखात उपचार कसा होणार असा सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. तर सगळ्या रुग्णांना किमान इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी ही तज्ज्ञांनी केली आहे. त्यातही इंजेक्शन लवकरात लवकर आणि मूलबक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत अशी ही कळकळीची विनंती आता ते करत आहेत. तेव्हा मुबलक इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकार पुढे आहे. हे आव्हान आता सरकार कसे पेलते हे लवकरच समजेल. दरम्यान या इंजेक्शनची टंचाई दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी ज्या अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)वर आहे, त्या एफडीएचे वरिष्ठ अधिकारी डी आर गहाणे यांच्याशी संपर्क साधला, परंतु ते बैठकीत असल्याने काहीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पण एफडीए इंजेक्शनची टंचाई दूर करण्यासाठी कंपन्याशी चर्चा करत असून, इतरही उपाययोजना करत असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - तौक्तेचा तडाखा : मुख्यमंत्री घेणार मंत्रिमंडळाची बैठक