मुंबई - राज्य सरकारने जाहीर केल्या प्रमाणे अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मुंबईमध्येही याची अंमलबजावणी 7 जून म्हणजेच येत्या सोमवारपासून केली जाणार आहे. त्यानुसार सर्व दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, रेल्वे, मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असणार आहेत. याबाबतचे परिपत्रक पालिकेकडून काढण्यात आले आहे.
पालिकेचे परिपत्रक -
राज्य सरकारच्या ब्रेक द चैन मोहिमेअंतर्गत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी परिपत्रक काढले आहे. राज्य सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबईचा लेव्हल 3मध्ये समावेश केला आहे. त्याप्रमाणे सर्व नियम लागू असतील असे परिपत्रकात म्हटले आहे. लेव्हल 3 प्रमाणे महिलांना लोकल ट्रेन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, पालिकेने अशी मुभा नसेल असे स्पष्ट केले आहे. यामुळे आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यानाच लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. सर्व दुकाने आस्थापनानी कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून नियमाचे उल्लंघन केल्यास साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाणार असे परिपत्रकात म्हटले आहे.
काय सुरु, काय बंद -
सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहण्यास मुभा आहे. मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असतील. मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील. महत्त्वाची खासगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. शासकीय कार्यालय 50% उपस्थितीत सुरू राहण्यास मुभा आहे. लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी, महत्त्वाच्या मिटिंगसाठी 50% उपस्थिती, केवळ बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा असेल. शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करण्यास मुभा असेल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर पाचनंतर संचारबंदी लागू होणार आहे. जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक आसनक्षमतेनुसार सुरू राहील.
सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेन प्रवास नाही -
मुंबईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतली लोकलमधून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली जाणार नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तपासला जाईल आणि त्यानुसार त्या जिल्ह्याला त्या त्या लेव्हल नुसार सूट दिली जाणार आहे. त्यामुळे येणारा काळात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट झपाट्याने कमी झाला तर नक्कीच मुंबईकरांना लोकल सेवा खुली केली जाईल असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आले आहे.