मुंबई : गेल्या वर्षी तीन दिवसांचं एक सरकार स्थापन झालं होतं. या सरकारची आज पुण्यतिथी आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत आज म्हणाले. ते मागील वर्षी फडणवीस-अजित पवार यांनी स्थापन केलेल्या सरकारबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी, कोणी काहीही बोललं, तरी आमचं सरकार आणखी चार वर्षे तरी पडणार नसल्याचं म्हणत रावसाहेब दानवेंनाही टोला लगावला आहे.
तीन दिवसांच्या सरकारची पुण्यतिथी..
केंद्रीय नेते रावसाहेब दानवे यांनी दोन ते तीन महिन्यांमध्ये राज्यात भाजपची सत्ता असेल, असे वक्तव्य केले होते. याबाबत विचारणा केली असता राऊत यांनी दानवेंना टोला लगावला आहे. गेल्यावर्षी तीन दिवसांच्या सरकारचा एक प्रयोग राज्यात झाला होता. त्या तीन दिवसांच्या सरकारची आज पुण्यतिथी आहे. आता जर कोणी तीन महिन्यात आपलं सरकार बनवणार असेल, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना स्वतःच्या मनोविश्वात जगूद्या, त्यात चार वर्षे निघून जातील. महाविकास आघाडी सरकार मात्र पुढील चार वर्षे पूर्ण करणार आहे, असे ते म्हणाले.
देशात सर्वात स्थिर सरकार..
तीन पक्षांचे सरकार असूनही, देशात सर्वात स्थिर सरकार हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार मजबूतीने काम करत आहे, आणि महाराष्ट्रातील जनता या सरकारच्या पाठिशी आहे असे राऊत यावेळी म्हणाले.
चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर..
चंद्रकांत पाटलांनी काल म्हटलं होतं, की राष्ट्रवादीचे नेतृत्व हे सुप्रिया सुळेंकडे न जाता अजित पवारांकडे जाणार आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, की चंद्रकांत पाटलांची वेगळी अशी जर गुप्तचर यंत्रणा आहे, तर त्याचा वापर भारत सरकारने करुन घ्यावा. राजकारणात एवढी मजबूत गुप्तचर यंत्रणा मी पाहिली नव्हती, त्यामुळे त्याचा वापर चीन आणि पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी करावा. शरद पवारांना काय करायचं आहे, ते शरद पवार करतील असेही राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा : येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार, रावसाहेब दानवेंचा दावा