मुंबई - स्वातंत्र्याचे हवन परकीयांकडूनच होते असे नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्य़ाला भेटण्यासाठी 83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्य़ांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्य़ांनी देश खराब केला, दुसरे काय? असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींसह भाजपावर सडकून टीका केली आहे.
शिवसेनेचे पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या संपादयीक रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी अमेरिकेतील राजकारण आणि भारतातील परिस्थितीशी साधर्म्य दाखवत लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उडाला असल्याचे म्हटले आहे. तसेच टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा हे आपल्या एका आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी पुण्याला येऊन गेले होते. त्यांचा दाखला देत शेतकरी आंदोलनाकडे डोळेझाक करणाऱ्या पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्य़ांचे सगळय़ात मोठे आंदोलन सुरू असतानाही दिल्लीच्या सत्तावर्तुळात साधी सळसळ जाणवत नसल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे.
विरोधकांना नष्ट करणारी पोकळ लोकशाही-
अमेरिकेत ट्रम्प यांनी सत्ता टिकविण्यासाठी झुंडशाहीचे शेवटचे टोक गाठले. आपल्या गुंड समर्थकांना त्यांनी अमेरिकेच्या संसदेत घुसवून हिंसाचार केला. त्यात संसदेतच गोळीबार झाला. अमेरिकेच्या इभ्रतीची आणि लोकशाहीची पुरती लक्तरे त्यात निघाली. अमेरिका असेल किंवा हिंदुस्थान, आता लोकशाही ही शोभेचा आणि पोकळ डोलारा म्हणूनच उभी आहे. निवडणूक निकाल फिरवावा म्हणून ट्रम्प यांनी गयावया केली. हिंदुस्थानी लोकशाही पद्धतीत अशी गयावया वगैरे करावी लागत नाही. विरोधात उभे राहणाऱ्य़ांना नष्ट केले की काम भागते आणि निवडणुकांचे निकाल ठरवून घेतले की झाले! लोकशाही या संस्थेवरील लोकांची श्रद्धा आता पूर्ण उडाली आहे!
मागासल्या समाजात लोकशाही पद्धतीतील राज्यकर्त्यांचे रूपांतर हुकूमशहात होणे असंभवनीय नाही.'' हे शिरवाडकरांनी लिहिले. आज देशात नक्की कोणती 'शाही' आहे ते कोणीच सांगू शकणार नाही. आपण मागासलेले जरा जास्तच झालेलो आहोत. असे म्हणत त्यांनी देशात पंतप्रधान मोदी हे हुकूमशहा झाल्याची अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींचा जयजयकार करणारेच फक्त देशभक्त-
देशभक्तीची नवी लस सध्याच्या राज्यकर्त्यांनी लोकांना टोचली आहे. त्या लसीचा परिणाम असा की, सध्या आपल्या देशात प्रचाराचा, विकासाचा, विचाराचा मुद्दा म्हणजे देशभक्ती हाच बनला आहे. जणू काही 'देशभक्ती' या शब्दाचा उदय 2014 नंतर झाला. त्याआधी शतकानुशतके देशभक्ती कशाशी खातात हे हिंदुस्थानवासीयांना माहीत नव्हते. स्वातंत्र्य संग्रामात जे सहभागी झाले व मरण पावले तेसुद्धा सध्याच्या युगात देशभक्त नसावेत. पंतप्रधान मोदी व भाजपचा जयजयकार करीत आहेत तेच देशभक्त असे आता नक्की करण्यात आले आहे. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांच्यावर टीका करणारे व त्यांच्या विरोधात बोलणारेही एकतर देशभक्त नव्हते अथवा ते क्रांतीचे म्हणजे देशाचे शत्रू ठरवले गेले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
टाटा का मोठे?
पंजाबच्या सीमेवर शेतकरी थंडी-वाऱ्य़ात कुडकुडत उभा आहे. या आंदोलनात 57 शेतकरी मरण पावले. त्यांच्याविषयी संवेदनेचा एकही चकार शब्द न काढणाऱ्य़ांचे सरकार दिल्लीत आहे. असे माणुसकी नसलेले सरकार कोणत्या 'शाही'त बसते? टाटांसारखे लोक मोठे का? हे अशा वेळी समजते. आपला एक माजी कर्मचारी आजारी आहे हे समजताच रतन टाटा हे मुंबईतून प्रवास करीत पुण्यात गेले. त्या कर्मचाऱ्य़ाला त्याच्या छोटय़ा घरात जाऊन भेटले. त्याच्या कुटुंबास धीर दिला. प्रत्येक पिढीतले 'टाटा' हे भारतरत्न का झाले व अंबानी-अदानी यांना 'टाटां'ची प्रतिष्ठा का मिळू शकली नाही, त्याचे उत्तर टाटांच्या या जीवनशैलीत असल्याचे सांगतानाच, हे टाटादेखील सध्या मोदी नीतीचे समर्थक असल्याचा एक फटकारा देखील लगावला आहे.
आपला देशही त्यास अपवाद नाही!
स्वराज्यातल्या सत्ताधाऱ्य़ांकडून स्वातंत्र्याचे हवन होतच असते. तेव्हा पुनः पुन्हा नव्या स्वातंत्र्यासाठी झगडावे लागते. हे जगभरात होत आले. आपला देशही त्यास अपवाद नाही! हे सांगतांना राऊत यांनी स्वित्झर्लंडच्या स्वतंत्र लढय़ाचे उदाहरण देत हिंदुस्थानातही गुलाम लोक बादशहाच्या टोपीला मुजरे झाडतच आले. जगाचे व देशाचे चित्र काही वेगळे नाही. अमेरिकेतील जनतेने झुंडशाही करणारा बादशहा व त्याच्या टोपीसही उडवले. जगातील लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी हा शुभशकुन असल्याचे म्हटले आहे.