मुंबई - जागतिक माध्यमातून भारतातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर कठोर प्रहार होत आहे. असे असताना भारतातील बुद्धिवंत आणि कार्यकर्ते करत असलेले ट्विटस् हटवण्याचे केंद्र सरकारने फर्मान दिले असेल तर ही मुस्कटदाबी आहे, असा थेट हल्ला शिवसेनेने मोदी सरकारवर केला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने जागतिक माध्यमे आणि देशातील विरोधीपक्ष नेते, बुद्धिवंत यांची चिंता समजून घेण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. त्यासोबतच पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लँट उभे करण्याच्या केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या घोषणेचे स्वागतही केले आहे. कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरली नसली तरी तिसऱ्या लाटेला तयार असले पाहिजे, असेही शिवसेनेने सुचविले आहे.
ही मुस्कटदाबीच...
हिंदूस्थानातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त करणाऱ्या भूमिका देशातील अनेक बुद्धिवंत, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते मंडळी 'ट्वीटर' सारख्या समाजमाध्यमातून मांडीत असतात. मात्र आता त्यांच्या 'ट्विट'वर बडगा उगारण्यात आला आहे. ही सर्व 'ट्विटस्' हटविण्याचे फर्मान आता सुटले आहे. हे खरे असेल तर हा मुस्कटदाबीचाच प्रकार आहे. असा थेट हल्ला शिवसेनेने मोदी सरकारवर केला आहे.
जागतिक माध्यमांची चिंता समजून घ्या
शिवसेनेने म्हटले आहे, की 'पंतप्रधान मोदी यांनी मान्य केले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुफानात देश मुळापासून हादरु गेला आहे. पंतप्रधानांचे हे म्हणणे चुकीचे नाही. पंतप्रधानांनी असेही सुचवले आहे की, उगाच अफवा पसरवून गोंधळात भर टाकू नका हेसुद्धा बरोबर आहे. मुळात अफवा कोण पसरवीत आहेत? मनमोहन सिंग, राहुल गांधी, केजरीवाल, उद्धव ठाकरे, प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी कोरोनासंदर्भात अफवा पसरवतात व त्यामुळे देशाची स्थिती गंभीर झाली असे कुणाला वाटत असेल तर देशातील गंभीर स्थितीबाबत जगभरातील प्रसारमाध्यमांनी मांडलेली चिंता समजून घेतली पाहिजे.'
'मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहुत'
कोरोनामुळे देशातील आरोग्य यंत्रणेचा कारभार जगासमोर आला आहे. त्यावर जगभारतून टीका होत आहे. याच संदर्भ देताना शिवसेनेने म्हटले आहे, 'प्रख्यात व्यंगचित्रकार डेव्हिड रोवे यांनी पंतप्रधान मोदींवर एक जहाल व्यंगचित्र रेखाटून परिस्थितीचे गांभीर्य समोर आणले आहे. एक अगडबंब हत्ती जमिनीवर मरुन पडला आहे व त्या मेलेल्या हत्तीवरील अंबारीत श्री. मोदी हे माहुताच्या भूमिकेत बसले आहेत. 'मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहुत' अशा शिर्षकाचे हे टोकदार व्यंगचित्र ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. हे व्यंगचित्र देश म्हणून आपली मानहानी करणारे आहे. पण या मानहानीबद्दल दिल्लीश्वर कोणाला जबाबदार धरणार आहेत?' असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
तिसऱ्या लाटेशी मुकाबला
आता तयारी तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्याची आहे. असा इशाराच शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे. त्यासोबत म्हटले आहे, की 'एक तर दुसऱ्या लाटेचे तुफान थांबवायला हवे आणि तिसऱ्या लाटेस थोपविण्यासाठी मजबूत बांध घालून सरकारने सर्वप्रकारे सज्ज राहायलाच हवे.'
(छायाचित्र सौजन्य - सामना)