मुंबई - शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.
संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरासुद्धा करणार आहेत. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवैसींची एमआयएमसुद्धा रिंगणात आहे. आता शिवसेनाही निवडणूक लढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केल्याने बंगाल विधानसभेचे चुरस वाढणार आहे.
शिवसेनेने यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये 100 जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पश्चिम बंगालचा दौरा करू शकतात अशी घोषणा केली होती. शिवसेना कोलकाता, हुगळी, डमडमसह अनेक शहरी भागात आपले उमेदवार उभे करू शकते.
शिवसेना बंगालच्या रिंगणात उतरल्याने भाजपला काही प्रमाणात फटका बसू शकतो. भाजपने या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून तृणमूलचे अनेक नेते आपल्या गळाला लावले आहेत. शिवसेनेने 2019 मध्येही लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये आपले उमेदवार दिले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजप रालोआचे घटकपक्ष होते. मात्र आता शिवसेनेच्या निर्णयाने भाजपला काही प्रमाणात फटका बसू शकतो. यापूर्वीही संजय राऊत यांनी कोणीही काहीही करा, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच जिंकणार, असंही म्हटले होते.