मुंबई - देशभरात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर मागील वर्षी रेल्वे सेवा बंद करण्यात आली. त्यावेळी रेल्वे सेवा सूरु करा अशी मागणी भाजपवाल्यांनी का केली नाही? तेव्हा भाजपवाले कुठे होते? असे प्रश्न मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपस्थित केले आहेत. भाजपला शिवसेनेने जगवले असा टोलाही जाधव यांनी लगावला आहे.
'भाजपाला शिवसेनेने जगवले'
मुंबई महापालिकेतील सभा ऑनलाइन ऐवजी प्रत्यक्ष घेण्यात याव्यात, पत्रकारांना पालिकेच्या बैठकांमध्ये प्रवेश देण्यात यावा, बेस्टमध्ये सदस्यांना बोलू न देता तिकीट प्रणालीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, तो प्रस्ताव रद्द करावा आदी मागण्यांसाठी बुधवारी भाजपाने मुंबई महापालिका मुख्यालयातील महापौर कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावर यशवंत जाधव बोलत होते. यावेळी बोलताना भाजपाकडून करण्यात येणारे आरोप हे अर्थ नसलेले आहे. 1987 पासून पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेना मुंबईचा विकास करत आली आहे. या कार्यकाळात भाजपा आमच्यासोबत होती. भाजपाचे मोठ्या संख्येने नगरसेवक नसतानाही ते आमच्यासोबत होते. त्यांना जगवण्याचे काम शिवसेनेने केले आहे असा टोला जाधव यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशात नद्यांमधून मृतदेह वाहून जात होते. गुजरातमध्येही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात असताना तेथील नागरिक उपचार घेण्यासाठी मुंबईत येत होते. त्यांच्यावर पालिकेने उपचार केले आहेत.
'तेव्हा भाजपवाले कुठे होते'
मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला. देशभरात लॉकडाऊन लागले. त्यावेळी मुंबईची रेल्वे बंद करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची इच्छित स्थळी ने-आण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बेस्टला अनुदान देण्याचा निर्णय घेतला. बेस्टला अनुदान दिले, एसटीच्या बसेस मागवल्या आणि मुंबईकरांना परिवहन सेवा उपलब्ध करून दिली. त्यावेळी भाजपावाले कधीही रेल्वे सेवा सुरू करा म्हणून मागणी करायला पुढे का आले नाही? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे. वरातीमागून घोडे पळवणे व प्रश्न निर्माण करणे इतकेच त्यांच काम असल्याची टीकाही जाधव यांनी केली आहे.
'भाजपाला हे दिसत नाही का?'
राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे व सर्व सहाकारी मंत्र्यांनी केले आहे. मुंबईचा विकास करताना पर्यटन कसे वाढेल, ऐतिहासिक ठेवा कसा जतन केला जाईल याची नियोजन केले आहे. राणीबागेत पेंग्विन आणल्यावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे, राणीबागेचे उत्पन्नही वाढले आहे. मुंबईत पावसाचे पाणी साचू नये यासाठी जमिनीखाली पाणी साठवता येईल असे प्रकल्प सुरू केले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवला. त्याची दखल उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.
'निवडणुकीमुळे पत्रकारांचा विषय'
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या बैठकांमध्ये पत्रकारांना प्रवेश दिला जात नाही. यामुळे बैठकांमध्ये काय झाले याची माहिती मुंबईकरांना मिळत नाही. पालिकेच्या बैठकांमध्ये कोणते निर्णय झाले याची माहिती मुंबईकरांना मिळावी यासाठी बैठकांमध्ये पत्रकारांना प्रवेश द्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे. यावर येत्या पालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांचा विषय भाजपाने घेतला आहे असा टोलाही जाधव यांनी लगावला आहे.