मुंबई - 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मणगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे! आता पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का? असा सवाल भाजपा नेते, अॅड. आशिष शेलार यांनी शिवसेनेला केला आहे.
हेही वाचा - बेळगाव : शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवला; गावात तणावाचे वातावरण
तर, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी. त्याविषयी विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. चार दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?' असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला.
'महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी. राजकारण न करता या राज्यातल्या विरोधीपक्षाच्या प्रमुखांना म्हणजेच विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का हे विचारा' असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवा; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
यावर संजय राऊत आणि शिवसेनेवर शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. 'कर्नाटकातील मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला, याचा आम्ही निषेधच करतो. या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या देशामध्ये, अखंड हिंदुस्तानामध्ये कधीही कोणी करता कामा नये, तो आम्ही होऊही देणार नाही. पुतळा हटवण्यामागे स्थानिक कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका कारणीभूत आहे. कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या जारकीहोळी यांच्याविरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का? हा सवाल आमचा तुम्हाला आहे'. असे शेलार म्हणाले.
'आंदोलन छत्रपतींसाठी करावं लागलं, तर परवानगीची गरज काय? शिवसेनेला विरोधीपक्ष नेता आणि भाजपच्या परवानगीची गरजच का लागते, या प्रश्नाचे उत्तरही तुम्हालाच द्यावे लागेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच ठिकाणी आणि सन्मानाने जसा तहसीलदार आणि पोलीस पाटलांनी सांगितलं, त्याच पद्धतीने झाला पाहिजे. कर्नाटकच्या सरकारला आमची विनंती आहे. शिवसेनेने आंदोलन जरुर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही, याचं उत्तर द्यावं' अशा शब्दात आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा - विशेष मुलाखत: गांधीजींचा 'चले जाव'चा नारा आणि क्रांतीदिनाची पार्श्वभूमी