मुंबई : शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिवसेना हे तात्पुरते गोठवले. अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला ते वापरता येणार नाही. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निशाणी गोठवल्यानंतर या निर्णयाचा निषेध शिवसेनेकडून करण्यात (Shiv Sena petition against Election Commission) आला.
कायदेशीर लढा - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेनेने दिल्लीच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाचे म्हणणं, ऐकून न घेताच शिवसेनेची निशाणी आणि पक्षाचे नाव गोठावलं असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर आता कायदेशीर लढा देण्याची तयारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून सुरू झाली आहे.
प्रतिज्ञापत्र तपासली का ? तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला प्रतिज्ञापत्र जमा करण्याबाबतचा वेळ दिला होता. शिवसेनेने सात लाख पर्यंत प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा केले. मात्र केवळ चार तासात शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने कसा काय घेतला? या चार तासात केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व प्रतिज्ञापत्र तपासली का? असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.