मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १५ ऑगस्ट पूर्वी होणार अशा चर्चा रंगू लागलेल्या ( Shinde government Expansion ) आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ( Eknath Shinde Devendra Fadnavis meeting ) त्यांच्या नंदनवन या बंगल्यावर दाखल झाले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांचे सरकार येऊन ४० दिवसाचा कालावधी लोटून गेला तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. यावरून यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. दुसरीकडे बंडखोर ४० आमदारांचा दबावही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली आहे.
दिल्लीवरून हिरवा कंदील?- राज्यातील एक न अनेक प्रश्न सध्या आ वासून पुढे उभे आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही मागील ४० दिवसापासून रखडला ( MH government expansion pending ) आहे. अशातच कालच दिल्ली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाईल असे सांगितले. परंतु मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल, असे मागील ४० दिवसांमध्ये वारंवार सांगितले जात असल्याची टीका खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा केली आहे. त्याच अनुषंगाने आता १५ ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची इच्छा शिंदे - फडणवीस सरकारची दिसत आहे. व त्याबाबत दिल्लीवरूनही हिरवा कंदील मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु मंत्रिपदासाठी अनेक दावेदार असल्याकारणाने सध्या जास्त गाजावाजा न करता १० ते १५ मंत्र्यांना शपथविधी देण्यात यावा अशीही चर्चा आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावरून सातत्याने होत आहे टीका? राज्यात मंत्री उपस्थित नसल्याने त्यांचे अधिकार सचिवांना दिल्याने सरकारवर टीका होत आहे. तर दुसरीकडे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्याधिकारी कार्यालयात पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो. यंदा पालकमंत्री उपस्थित नसल्याने हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार असल्याने त्याची नामुष्की सरकारला पत्करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने ही या बैठकीत चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून होणाऱ्या टीकेला थांबवण्यासाठी सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार गरजेच असल्याची भूमिका शिंदे फडणवीस सरकारने घेतली आहे.
किती मंत्री घेणार शपथ यावरही चर्चा? मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांना शपथ दिला जाईल याबाबतही अजून संभ्रम असल्याने याबाबतही सविस्तर चर्चा या बैठकीत होण्याची अपेक्षा आहे. भाजपकडून १२ ते १४ तर एकनाथ शिंदे गटाकडून ८ ते १० मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे १२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या अपात्र आमदारांच्या बाबत सुनावणी असल्याकारणाने १२ ऑगस्ट नंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा का? याबाबत सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आज रात्री सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले आहे.