नवी दिल्ली - राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल हातात येऊन आता दहा दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरीही, अजून सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही सेना-भाजपमधील कलहामुळे युतीचे सरकार स्थापन होत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे सत्तेच्या वेगवेगळ्या पर्यायांची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या चर्चेनंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी आणि माझ्यात झालेल्या चर्चेबाबत जास्त काही सांगण्यासारखे नाही, असे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, की मागील काही दिवसांपासून आम्ही पाहत आहोत, शिवसेना आणि भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी होत नाही. मात्र, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.
सेनेकडून प्रस्ताव नाही..
सत्तास्थापनेच्या पर्यायांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा एका पर्यायाची गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली का? असे विचारले असता, पवार म्हणाले की शिवसेनेकडून अद्याप आम्हाला कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे याबाबत आम्ही चर्चा करण्याचा प्रश्नच नाही.
सोनिया गांधींना पुन्हा भेटणार..
सोनिया गांधींची आपण पुन्हा एकदा भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती पाहता, पुढील वाटचालीसंदर्भात आपण ही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युतीने आपले कर्तव्य पार पाडावे..
सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत आम्ही विचार करत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना सत्तेचा कौल दिला, त्या महायुतीकडे पुरेसे संख्याबळ आहे. मात्र, ते सत्ता स्थापन करत नाहीत. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता, त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापन करून आपले कर्तव्य पार पाडायला हवे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..?
यादरम्यान, शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का? असे एका पत्रकाराने विचारले असता, शरद पवारांनी त्यावर 'नाही!' असे एका शब्दात उत्तर दिले. त्यामुळे नक्कीच शरद पवार मुख्यमंत्री होतील यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.