मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा होत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना परिस्थिती, शेतकरी मदत यावर ही चर्चा होत आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
तत्काळ दुसरी भेट असल्याने राजकीय चर्चांना उधान
राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारला दीड वर्ष त्या उपाययोजनांवर घालवावी लागली. त्यानंतर आता कुठे हा आजार आटोक्यात आला आहे. एकीकडे जनजीवन सुरळीत होत असताना केंद्रीय यंत्रणेचा तपास महाविकास आघाडीसाठी आता डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यातच राज्यातली वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, शेतकर्यांच्या आत्महत्या या सर्व मुद्द्यांवर हे सरकार अपयशी ठरत असताना मुंबई महानगर केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू असलेल्या छापेमारीला प्रखर विरोध करण्यासाठी शरद पवार व मुखयमंत्री उद्वव ठाकरे यांच्यात नुकतीच चर्चा झाली आहे. त्यानंतर ही तत्काळ दुसरी भेट असल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.