मुंबई - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. त्यानंतर आता उर्वरित वर्ग येत्या 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. उर्वरित वर्ग सुरू करण्याचा पुढच्या आठवड्यात शिक्षण विभागाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा - Guidelines for Schools : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू; वाचा मार्गदर्शक सूचना
- पुढच्या आठवड्यात होणार बैठक-
मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात १५ जून २०२१ आणि विदर्भात २८ जून २०२१ पासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आता उर्वरित शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, येत्या कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केल्यानंतर आता शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग आणि राज्यातील उर्वरित वर्ग येत्या 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत पुढच्या आठवड्यात शिक्षण विभागाची बैठक बोलवण्यात आली आहे. उर्वरित वर्ग सुरू करण्यास संबंधित चर्चा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
- शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री घेणार निर्णय-
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शाळा सुरू करण्यासंबंधित पहिली बैठक पार पडली आहे. आता दुसरी बैठक पुढच्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाबरोबर होणार आहे. उर्वरित वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा होईल आणि चर्चेनंतर त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे.
हेही वाचा - School Reopen : कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू