मुंबई - मुंबईतील महापालिका शाळा ( Mumbai Municipal Corporation Schools ) आणि खासगी व्यवस्थानाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या शाळा आज सोमवारी (13 जून) सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. असेच आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, हे आदेशाला केराची टोपली दाखवून मुंबईतील शाळा आजपासून सुरू होत आहेत. यामुळे संभ्रम निर्माण झाल्याची टीका शिक्षक संघटनेने केली आहे.
मुंबईत आजपासून शाळा सुरू - दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरुवात 13 जून पासून होते. गेली दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. यंदा कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने विदर्भातील शाळा 27 जूनपासून तर उर्वरित राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याची तसेच पहिल्या दिवशी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रक जारी करून यासाठीची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. शिक्षण विभागाने विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, त्या आदेशाला केराची टोपली दाखवत मुंबईतील शाळा मात्र आज 13 जूनपासून सुरू केल्या जाणार आहेत.
मोठा संभ्रम निर्माण झाला - राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे व त्या दिवशी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, मुंबई आणि परिसरात सोमवारी 13 जून रोजीच शाळांमध्ये विद्यार्थी दाखल होणार असल्याने प्रवेशोत्सवाचा मोठा संभ्रम निर्माण झाला असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.
प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम 15 जून रोजीच - याबाबत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, विद्यार्थ्यांचा निकाल देतानाच 13 जून रोजी शाळा सुरू होईल, असे सांगण्यात होते. त्या अनुषंगाने पालिका आणि खासगी शाळांनी तयारी केली आहे. 13 जूनला शाळा सुरू होत असल्या तरी शिक्षण विभागाच्या निर्णयाप्रमाणे प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हा 15 जूनरोजीच घेतला जाणार असून त्याचीही तयारी सुरू असल्याचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले. मुंबईत शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क लावण्यासोबतच शाळांमध्ये स्वच्छता राखणे, विशिष्ट अंतरावर त्यांना बसविण्यासाठीची काळजी शाळांकडून घेतली जाणार आहे, असेही कंकाळ म्हणाले.
शाळांची संख्या | |
महापालिका प्राथमिक | 964 |
महापालिका माध्यमिक | 243 |
महापालिका पूर्वप्राथमिक | 815 |
खासगी अनुदानित | 393 |
खासगी विनाअनुदानित | 379 |
एकूण शाळा | 3 हजार 94 |
हेही वाचा - School Entrance Ceremony : शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव