मुंबई - राज्यभरासह आजपासून मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यानुसार 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरु केले जाणार आहेत. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिकेकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या शाळेत काय परिस्थिती आहे, कशाप्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात आली आहे. मुलुंड येथील विणानगर महानगर पालिकेतील शाळेतून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने आढावा घेतला आहे.
शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत -
दीड वर्षापासून बंद असलेली शाळा आजपासून पुन्हा एकदा जोमाने सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती पाहता बाकीचे वर्ग देखील चालू करण्यात येणार आहे. आज अनेक शाळांमध्ये शाळा व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. मुलुंड येथील महानगरपालिकेच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत होता. कारण की ऑनलाईन अभ्यास विद्यार्थ्यांना जमत नव्हता. छोटे असलेले घर, ऑनलाईनसाठी लागणारी सामग्री नसल्यामुळे होणारा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. मात्र शाळा सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांना आनंद झाल्याचे दिसत आहे.
'मला लय आनंद झाला'
आम्हाला लय आनंद झाला आहे की आमची शाळा सुरू झाली आहे. 18 महिने शाळा बंद होती. ऑनलाइन शिक्षणात आम्हाला खूप अडचणी येत होत्या. आता पून्हा आमच्या मॅडम आम्हाला समोर उभ्या राहून शिकणार आहेत. यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केल्या.
या निर्णयामुळे मुलांना थेट अभ्यास करता येणार -
आज शाळा सुरू झाला तर खरंच खूप आनंद होत आहे अनेक महिन्यापासून शाळा बंद होत्या. आता शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन अभ्यासामुळे महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यास खंड पडला होता. कारण अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे परवडत नव्हते मात्र आता या निर्णयामुळे त्यांना थेट अभ्यास करता येणार आहे, असे शाळेचे मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी सांगितले.
पुण्यात शाळा सुरू ! विद्यार्थ्यांचे औक्षण करत चॉकलेट देऊन स्वागत
पुणे- कोरोनाच्या पश्वभूमीवर सुमारे दीड वर्ष बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. ग्रामीण भागात 5 वी ते बारावी आणि शहरी भागात 8 वी ते 12 अशी शाळा सुरू होणार आहेत. पुण्यातील राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये विदूषकांच्याहस्ते चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तर, पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूल येथे आज विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आज शाळा सुरू झाल्याने खूप आनंद होत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणात खूप फरक आहे. ऑफलाईनमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षक जे शिकवत आहेत. ते चांगल्यापद्धतीने लक्षात येते. घरच्यांनी काळजी घ्या आणि मास्क, सोशल डिस्टनसिंगचा वापर करा, असं सांगितलं आहे', असं विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करताना सांगितले.
औरंगाबाद : तुतारी आणि बँडच्या गजरात मनपा शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
औरंगाबाद - दीड वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर सोमवारी पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शाळांनी केल्या. त्यात महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत तुतारी आणि ढोल वाजवत मुलांचे स्वागत करण्यात आले. इतकेच नाही तर, येणाऱ्या प्रत्येक मुलाचे तोंड गोड करण्यासाठी त्याला चॉकलेट देण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. चार ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेता येईल, मुलांना शिक्षण घेता येईल याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील 413 शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख 36 हजार 415 विद्यार्थी व 4 हजार 511 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या निमित्ताने पुन्हा शाळेत दाखल होणार आहेत.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 'ज्ञानपीठ' उघडले; नागपुरातील २२५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट
नागपूर - कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून (मार्च २०२०) बंद असलेल्या शाळा कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर अखेर आजपासून (सोमवारी) सुरू झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार ८ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा सुरू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आज (सोमवारी) नागपूर शहरातील २२५ शाळांची पहिली घंटा वाजली आहे. गेल्या दीड वर्षात विद्यार्थ्यांची शाळा केवळ मोबाइलवरच भरवली जाते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वैताग आला होता. मात्र आज प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्याने शिक्षकांसोबतच विद्यार्थी वर्ग सुखावला आहे.