मुंबई - राज्याच्या गृहरक्षक दलाचा नवीन पदभार स्वीकारणारे परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. 100 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी क्राइम ब्रांचमधल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत त्यांनी सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये यासंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करणारे परमबीर सिंग यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर परमबीर सिंग यांची पत्नी सविता सिंग या स्वतः 6 कंपन्यांच्या संचालक पदावर असून यामध्ये दोन कंपन्या या इंडिया बुल्सशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - परमबीर सिंह भाजपचे दलाल; राष्ट्रवादीचे नागपुरात आंदोलन
हरयाणामधून पदव्युत्तर शिक्षण
हरयाणामधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठातून सविता सिंग यांनी एलएलबीची पदवी घेतली होती. त्या खेतान अँड कंपनीच्या भागीदार असून ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करते. सविता सिंग या इंडियाबुल्स प्रॉपर्टीच्या कंपनीवर संचालकपदावर होत्या. तर येस ट्रस्टी लिमिटेडच्या संचालकपदावर त्यांना ऑक्टोबर 2017मध्ये नेमण्यात आले होते. याबरोबरच सोरील इन्फ्रा रिसोर्सेस या संचालकपदावर त्या राहिल्या असून इंडियाबुल्स एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकपदावरसुद्धा त्या होत्या.
या आयपीएस अधिकाऱ्यांच्या पत्नी आहेत संचालकपदावर
सविता सिंग सध्या एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या संचालकपदावर असून श्रेयस हो. मॅनेजमेंटच्या संचालकपदावरसुद्धा त्या आहेत. श्रेयस मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकपदावर केवळ सविता सिंगच नाही तर आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांच्या पत्नी मेघा फणसाळकर, आयपीएस देवेन भारती यांच्या पत्नी सरूची देवेन भरती, आयपीएस सदानंद दाते यांच्या पत्नी मनिषा सदानंद दाते यांही या कंपनीच्या संचालकपदावर आहेत.
हेही वाचा - 'लवकरच सत्य बाहेर येईल व आरोप करणारे तोंडघशी पडतील'
'आयपीएस अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी रास्त'
मुंबई पोलीस खात्यातील ज्येष्ठ अधिकारी व कायदेतज्ज्ञ धनराज वंजारी यांच्या म्हणण्यानुसार, कुठल्याही आयपीएस अधिकाऱ्यांची संपत्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपत्तीबद्दल चौकशी होणे रास्त आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून ही चौकशी केली जाऊ जाऊ शकते. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना संविधानाकडून संरक्षण मिळाले असून त्यांना मिळालेल्या अधिकारानंतर त्यांची जबाबदारीसुद्धा त्याहून दुप्पट वाढते. मात्र, अशा वेळेस एक किंवा दोन टक्के सनदी अधिकाऱ्यांकडून जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर समाजातील इतर प्रश्न मागे पडतात. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोप जारी केले असले, तरी पुढच्या टप्प्यात परमबीर सिंग व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या संपत्तीचीही चौकशी होईल, असे अॅड. धनराज वंजारी म्हणतात.