मुंबई - काँग्रेसमध्ये नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. संजय निरुपम आणि जनार्दन चांदूरकर यांना पक्षाकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नियुक्तीवेळी सहा कार्याध्यक्ष आणि दहा उपाध्यक्ष तर 37 संसदीय सदस्य नेमण्यात आले. मात्र असे असले तरी यामध्ये जनार्दन चांदुरकर आणि संजय निरूपम यांचं नाव कुठे दिसत नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा संजय निरुपम यांना काँग्रेसने डावललं अशी चर्चा सुरू झाली होती.
मात्र आता पुन्हा एकदा संजय निरुपम यांना संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त करत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच जनार्दन चांदुरकर यांना देखील मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहे.
संजय निरुपम यांची संसदीय सदस्य मंडळात वर्णी-
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरुपम यांची गच्छंती केल्यानंतर ते काँग्रेसमध्ये खूप कमी वेळा सक्रिय असलेले पाहायला मिळाले. त्यानंतर नेहमीच त्यांची काँग्रेस विरोधी भूमिका राहिली. म्हणून काँग्रेसने त्यांना गेल्या काही काळामध्ये कोणतीच जबाबदारी दिली नव्हती. मात्र आता काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यक्रमामध्ये संजय निरुपम दिसायला लागले होते. त्यानंतर आता त्यांची संसदीय सदस्य मंडळात वर्णी लागली आहे.
कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून आणखी चार जणांना स्थान-
विशेष म्हणजे, हे तिघेही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच याशिवाय, कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून आणखी चार जणांना स्थान देण्यात आले आहे. त्यात नाना गावडे, सचिन नाईक, संजय राठोड आणि चारुलता टोकस यांचा समावेश आहे. या निवडीमुळे काँग्रेसने आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
हेही वाचा- CORONA LIVE UPDATE : शुक्रवारी राज्यात 8 हजारापेक्षा अधिक रुग्ण, तर 48 रुग्णांचा मृत्यू