मुंबई - सर्वांचे लक्ष लागून असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा ( Balasaheb Thackeray Samruddhi Highway ) पहिला टप्पा येत्या दोन मे पासून सर्वांकरिता खुला होणार आहे. या महामार्गाच्या नागपूरकडील शिवमडका चौकात बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या स्मारकापासूनच मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला सुरुवात होईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.
शिवमडका परिसरात बाळासाहेबांचे स्मारक - महाराष्ट्रातील राजधानी ते उपराजधानीला जोडणाऱ्या नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक वर्षे राजकारण केले. हिंदुहृदयसम्राट अशी बाळासाहेबांना उपाधी देण्यात आली. या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्यावे अशी शिवसेनेची तर भाजपकडून अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली जात होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाप्रमाणे या महामार्गावर साजेसे स्मारक उभारण्याचे एमएसआरडीसी प्राधिकरणाने प्रस्तावित केले होते. सुरुवातीला महामार्गाच्या मध्यवर्ती भागाचा विचार करण्यात आला. मात्र, आता नागपूरच्या शिवमडका चौकात स्मारक उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
असा असेल स्मारक - नागपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी शिवमडका भागातून महामार्गाची सुरुवात होते. त्यामुळे शिवमडका चौकातील ५ ते ७ एकर जागेत पूर्णाकृती भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल. सुमारे १० ते १२ फूट उंचीचा हा पुतळा असून मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या धर्तीवर बनवला जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, येथे ग्रीनरी, सोलर पॅनल उभारण्यात येईल. प्रवाशांचे लक्ष वेधून घेईल, अशा स्वरूपात काम केले जाईल, अशी एमएसआरडीसी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. वाशिम पासून नागपूरकडे जाणारा दोनशे दहा किलोमीटरचा पहिला टप्पा येत्या दोन मे पासून खुला होत आहे. या कालावधीत पुतळा उभारणे शक्य होणार नाही, असेही म्हणाले.
हेही वाचा - लाल महाल लावणी प्रकरण : नृत्यंगणेवर गुन्हा दाखल, मराठा महासंघाने केले शुद्धीकरण, शिवसेनेचे आंदोलन