मुंबई - तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील पाळत प्रकरणावरुन शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधले आहे. भाजप राजकारणात कोणती संस्कृती रुजवू पाहत आहे? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून विचारण्यात आला आहे. 'भाजपशिवाय या देशात कोणीच राहाता कामा नये याच मार्गाने ते प्रवास करत असतील तर त्यांना हा देश व जनतेचे मानस नीट समजलेले दिसत नाही.' असा टोला लगावत अग्रलेखात म्हटले आहे, की ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, पंजाबचे बादल, शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत असे अनेक बेडर होऊन संघर्ष करीत आहेत. सरकारकडे पाळत ठेवण्याची यंत्रणा असल्याने 'सामना' थांबणार नाही.
ममता बॅनर्जी 'बंगालची वाघीण'
तृणमूल काँग्रेसच्या झुंजार खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. "पाळत ठेवावी असे आपण काय केले आहे?" असा प्रश्न महुआ यांनी विचारला आहे. महुआ या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करतात. त्या प. बंगालातून प्रथमच निवडून आल्या, पण एखाद्या अनुभवी खासदारास मागे टाकतील अशी संसदीय झुंज त्या लोकसभेत देत आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना 'बंगालची वाघीण' असे म्हटले जाते. संपूर्ण केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्यासाठी प. बंगालात उतरले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
महुआंनी केली सरकारची बोलती बंद
महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत देशाच्या न्यायव्यवस्थेचा बुरखा फाडणारे भाषण केले. महुआ यांनी काय सांगतिले? न्यायव्यवस्था आता पवित्र नाही. केंद्र सरकार म्हणज अफवा, चुकीची माहिती पसरविणारा फुटीर उद्योग झाला आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला करताना सांगितले, 'काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि खोटेपणास शौर्य मानतात.' यावर भाजप जाम भडकल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे, की सत्ताधारी पक्षाचे लोक संसद काळात विरोधी पक्षांच्या खासदारांशी बोलायला घाबरतात.कुणी पाहिले तर राजकीय किंमत चुकवावी लागेल असे त्यांना वाटते. सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदारही एका सन्नाट्यात जगत आहेत. सामाजिक, राजकीय वातावरणात एक प्रकारची मूकबधिरता आली आहे व महुआ यांनी त्याच गुदमरलेल्या वातावरणाचा स्फोट केला आहे. लेखात पुढे म्हटले आहे, की सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान महुआ मोईत्रा यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले. 'देशाच्या नागरिकांना स्वतःचे खासगीपण जपण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असून तो मला जपायचा आहे,' असे महुआ यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना कळवले आहे. महुआ यांना अशा प्रकारे जेरबंद करुन वाघिणीचे गुरगुरणे व गर्जना थांबणार आहे काय? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
महुआ यांच्यावर पाळत ठेवून सरकारने स्वतःची दुर्बलता उघड केली. एका महिलेला सरकार घाबरले हेच आता स्पष्ट झाले आहे. हुकूमशाही ही सगळ्यात जास्त डरपोक असते, हे पुन्हा सिद्ध झाले. महुआ मोईत्रा यांनी त्यांचा बुरखा फाडला आहे.
हेही वाचा - आयपीएलमध्ये 'या' संघासोबत खेळण्याची मॅक्सवेलची इच्छा