मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास सुरू असताना या प्रकरणी ड्रग्ज सिंडिकेट समोर आले. तपासादरम्यान विविध संशयित आरोपी ड्रग्जचे सेवन करत असल्याचे देखील स्पष्ट झाले. याबाबत अधिक चौकशी करण्यात आली.
दरम्यान, जैद विलात्रा, अब्दुल बासित परिहार, सुशांत सिंहचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, हाउस किपिंग कर्मचारी दीपेश सावंत, रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक यांची एनसीबी रिमांड संपली होती. यानंतर त्यांना पुन्हा बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. 23 सप्टेंबर पर्यंत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीला मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये या सर्व संशयित आरोपींच्या वतीने जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर गुरुवारी सकाळी सुनावणी होणार आहे.
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर तपासाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत रवाना झाली. यादरम्यान सुरू असलेल्या चौकशीत अनेक नवे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागले. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील तपासाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.