मुंबई- रिया चक्रवर्ती हिचे ड्रग्स डीलरसोबत संबंध होते का? ज्या ड्रग्सबद्दल रिया चक्रवर्ती ड्रग्स डीलरला विचारत आहे, ते अमली पदार्थ कोणासाठी वापरले जात होते? याचा तपास सीबीआय व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून केला जाणार आहे. माध्यमांमध्ये यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर रिया चक्रवर्तीचे वकील अॅड. सतीश माने शिंदे यांनी या संदर्भात या गोष्टीचे खंडन केले आहे. रिया चक्रवर्तीने कधीही कुठल्याही अमली पदार्थाचे सेवन केले नसून गरज पडल्यास रिया चक्रवर्ती तिच्या रक्ताचे नमुने देण्यास तयार असल्याचा दावा अॅड. सतीश माने शिंदे यांनी केला आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय तपास करत असून सुशांतच्या कंपनीच्या संदर्भात ईडीकडून तपास केला जात असताना रिया चक्रवर्तीच्या मोबाईल फोनमधील डिलीट करण्यात आलेले व्हाट्सअप चॅट परत मिळवण्यात आल्यानंतर रिया चक्रवर्तीचे ड्रग डीलरसोबत अमली पदार्थाच्या संदर्भात संभाषण झाल्याचं समोर आलेलं आहे. हे व्हाट्सअप चॅट रिया चक्रवर्तीने केल्यानंतर डिलीट सुद्धा केले होते. मात्र ईडीकडून तिचा मोबाईल फोनमधला डेटा हा परत मिळवण्यात आलेला आहे. परत मिळवण्यात आलेला डेटा हा सीबीआय व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युुरोला तपासासाठी देण्यात आलेला आहे.
सीबीआयकडून यासंदर्भात आतापर्यंत काही जणांची चौकशी केली असून यामध्ये सुशांत सिंहचा कुक निरज सिंग सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी, हाउस मॅनेजर सम्युअल मिरांडा, हाउस कीपिंग कर्मचारी दीपेश सावंत याच्यासह सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर व अन्य व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे.
अद्याप सीबीआयकडून रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले नाही. पण लवकरच पुढच्या टप्प्यात सीबीआयकडून रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.