मुंबई - बच्चे कंपनी आणि पर्यटकांची आवडती राणीबाग कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर पुन्हा बहरू लागली आहे. शाळांना सुट्टी पडल्याने पर्यटकांच्या झुंडी राणीबागेत येत आहेत. यामुळे 2017 साली पेंग्विन आणल्यावर रेकॉर्ड ब्रेक पर्यटकांची नोंद ( Record Break Tourist Record in Ranibagh Mumbai ) झाली होती. आता पुन्हा राणीबाग याच रेकॉर्ड ब्रेक पर्यटकांच्या नोंदीकडे पुन्हा वाटचाल करत आहे. तसेच मे महिन्याच्या 22 दिवसांत राणीबागेला 1 कोटींचा महसूल ( 1 crore revenue to Ranibag ) मिळाला आहे. जो आतपर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक महसूल आहे.
पर्यटकांची गर्दी वाढली : राणीबाग म्हणजेच वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात 2017 मध्ये परदेशी हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली. त्यानंतर 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेले दोन वर्षे राणीबाग काही काळाचा अपवाद वगळला तर बंदच होती. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर नोव्हेंबरपासून पुन्हा राणीबाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. याच दरम्यान राणीबागेत वाघ, तरस, कोल्हा, बिबट्या, अस्वल आदी प्राणी आणण्यात आले. यामुळे शाळांना सुट्टी पडल्यावर पुन्हा राणीबागेत पर्यटकांनी गर्दी केली आहे.
पर्यटक, महसुलात वाढ : पेंग्विन आणल्यावर 2017 मध्ये राणीबागेला एकाच दिवशी 40 हजार पर्यटकांनी भेट दिली होती. ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यटकांची नोंद आहे. सध्या शाळांना सुट्टी असल्याने पर्यटकांनी राणीबागेत गर्दी केली आहे. रविवारी 22 मे रोजी एकाच दिवशी 26 हजार 111 पर्यटकांनी भेट दिली यामधून राणीबागेला 9 लाख 44 हजार 725 रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुन्हा पर्यटकांच्या उच्चांक नोंदवण्याकडे राणीबागेची वाटचाल सूरु आहे, अशी माहिती वीरमाता जीजबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
लवकरच 'हे' प्राणी पाहायला मिळणार : राणीबागेत सध्या हत्ती, वाघ, बिबट्या, कोल्हा, तरस, अस्वल आदी 300 हुन अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. यात धनेश, पोपट, सोनेरी तितर, मोर, कोकॅटिल, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन करडा पोपट आदी पक्षी पाहायला मिळतात. येत्या काही दिवसात राणीबागेतील वाघाचे पिल्लू, गुजरात येथून आणला जाणारा सिंह पर्यटकांना पाहता येणार आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले.
रेकॉर्ड ब्रेक महसूल : राणीबागेला गेल्या काही वर्षांत 22 दिवसात 1 कोटी रुपयांचा महसूल मिळाला नव्हता. मे 2022 मध्ये 22 दिवसात राणीबागेला 1 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या आधी नोव्हेंबर 2021 मध्ये 68 लाख, डिसेंबर 2021 मध्ये 75 लाख, मार्च 2022 मध्ये 84 लाख, एप्रिल 2022 मध्ये 69 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. राणीबागेला एप्रिल 2014 पासून मे 2022 या 8 वर्षांच्या कालावधीत 93,03,051 पर्यटकांनी भेट दिली असून 21 कोटी 93 लाख 49 हजार 333 महसुल प्राप्त झाला असल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली आहे.
हेही वाचा - Electric Vintage Car : विद्यार्थ्याने बनवली बॅटरीवर चालणारी कमी खर्चातील इलेक्ट्रिक विंटेज कार