मुंबई - संविधानाच्या मूळ प्रतीत राम, कृष्ण आणि भगवद गीतेचा उल्लेख असून, संविधान निर्मात्यांना यातूनच प्रेरणा मिळाली असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. 'मोदी सरकारच्या काळातील कायद्याच्या सुधारणा' या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात ते बोलत होते.
आपल्या भाषणात रविशंकर प्रसाद यांनी संविधानाची मूळ प्रत आपल्याकडे असल्याचा दावाही केला. तसेच या मूळ प्रतीच्या सुरुवातीलाच प्रभू राम श्रीलंकेतून अयोध्येत परत आल्याचे चित्र रेखाटले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, संविधानाच्या आतल्या पानांत भगवद गीतेचा सार असून, त्यावर श्रीकृष्णाचे चित्र असल्याचे त्यांनी सांगितले. या संविधानाच्या प्रतीत राम-कृष्ण आणि सीतेसह राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचीही छायाचित्रे आहेत. तसेच मुस्लिम राजांपैकी केवळ अकबराचे चित्र आहे. मात्र, अधिक काळ राज्य करणाऱ्या बाबरचे चित्र यात नाही, असेही रविशंकर म्हणाले.
आपल्याकडे असलेल्या संविधानाच्या प्रतीच्या शेवटी संविधान निर्मात्यांची सही देखील असल्याचे रविशंकर यांनी सांगितले.
हेही वाचा : आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्याच्या विधानावरून पियूष गोयल 'ट्रोल'