मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्य शासन आणि महानगरपालिका रेल्वेच्या आयसोलेशन कोचची मदत घेणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने सुद्धा कंबर कसली आहे. युद्धस्तरावर तयारीची सुरुवात केलेली आहे. यासबंधीत ईटीव्ही भारतने पश्चिम रेल्वेच्या कोच केअर सेंटरमध्ये जाऊन आढावा घेतला आहे.
गतवर्षी कोरोनाबाधित रुग्णांकरिता भारतीय रेल्वेने मेल- एक्सप्रेसच्या 5 हजार प्रवासी डब्यांचे आयसोलेशन कोचमध्ये रुपांतर केले होते. गेल्या वर्षी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर अनेक राज्यांनी केला. मात्र, महाराष्ट्रात या आयशोलेशन डब्याचा वापर करण्यात आलेला नव्हता. आता कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे रुग्णाची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आयशोलेशन कोचचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे. रेल्वे विभाग मोठ्या प्रमाणात आयसोलेशन कोचच्या निर्मितीच्या कामाला लागलेले आहे.
हेही वाचा-खंडणीसाठी वकिलाने केले क्लाइंटचे अपहरण
राज्य सरकारकडून आयसोलेशन कोचची मागणी-
पश्चिम रेल्वेच्या कोच केअर सेंटरचे वरिष्ठ अभियंता नवनाथ कदम यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, गेल्या वर्षी कोरोना रुग्णांचे आयसोलेशन करण्यासाठी आम्ही आयसोलेशन कोच तयार केले होते. मात्र, कोरोना नियंत्रणात आल्यानंतर या आयसोलेशन रेल्वे डब्यांचा वापर झालेला नाही. सध्या, मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारकडून रेल्वेच्या आयसोलेशन कोचची मागणी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या आयसोलेशन कोचला आम्ही स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून देणार आहोत. तसेच राज्य सरकारने पुन्हा आयसोलेशन कोचेसची मागणी नोंदवल्यास त्यांना ते उपलब्ध करून देणार आहोत.
हेही वाचा-ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन
तीन हजार रुग्णांची होणार सोय-
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमधील स्थिती बिघडत चालली आहे. रुग्णालयांमध्ये बेडही मिळत नाही आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षी प्रमाणे आताही मदतीसाठी तयारी दर्शविली आहे. सध्या पश्चिम रेल्वेकडे एकूण 386 आयसोलेशन कोच आहेत. त्यापैकी 128 कोच मुंबई विभागात आहेत. तर मध्य रेल्वेकडे एकूण 48 कोच असून त्यापैकी 25 कोच मुंबई विभागात आहे. या सर्व कोचेमधून जवळ जवळ एकाच वेळी 3 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची सोय होऊ शकते.
गेल्या वर्षी मध्य रेल्वेवर 482 आणि पश्चिम रेल्वेवर 410 आयसोलेशन कोच तयार केले होते. मात्र, त्यावेळी राज्य सरकारकडून आयसोलेशन कोचची मागणी न केल्याने हे कोच पडून होते. तर यातील अनेक आयसोलेशन कोच परत सामान्य रेल्वे गाडीला लावण्यात आले होते.
हेही वाचा-'गेल्या 70 वर्षांत एवढा बेजबाबदार पंतप्रधान देशानं पाहिला नाही'
आयसोलेशन कोचमध्ये या सुविधा-
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आयसोलेश कोचमध्ये कोविड रुग्णांच्या सोयीसाठी मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आले आहेत. तसेच कोचच्या खिडक्यांना पातळ जाळी लावण्यात आली आहेत. तसेच सुका आणि ओला कचऱ्यासाठी कचरा पेटी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आयशोलेशन डब्यात पंख्याची व्यस्था केली आहे. सध्या उन्हाळा असल्याने बाहेरून कुलर लावण्याची सोय करतात येते. प्रत्येक डब्यात 20 रुग्ण आयसोलेशनमध्ये राहू शकतात.