मुंबई - क्रूझ ड्रग प्रकरणात किरण गोसावीने प्रभाकर साईल आणि त्याचा भाऊ संतोष साईल याच्यावर गंभीर आरोप केले होते. हे सर्व आरोप प्रभाकर साईल याच्या भावाने फेटाळून लावले आहेत. गोसावीला ओळखत नसून, त्याला कधीही भेटलो नाही. त्यामुळे त्याने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे संतोष साईल याने सांगितले आहे. संतोष हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे.
हेही वाचा - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी सहा आरोपींना जामीन मंजूर
- गोसावीने केले होते साईलवर आरोप -
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला पंच प्रभाकर साईलच्या आरोपांमुळे वेगळे वळण लागले. साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रभाकर साईल हा मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी गोसावी याने एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडली होती. या व्हिडिओमध्ये बोलताना त्याने प्रभाकर साईल आणि त्याचा भाऊ संतोष साईलवर गंभीर आरोप केले होते.
- प्रभाकर साईलच्या भावाने आरोप फेटाळले -
संतोष साईलने सांगितले की, प्रभाकर साईल हा 4 महिन्यांपूर्वीच घर सोडून गेला होता, त्यावेळी किरण गोसावी याच्याकडे तो बॉडीगार्ड म्हणून नोकरीला लागला होता. तेव्हापासून आम्ही प्रभाकरच्या संपर्कात नाहीत. या प्रकरणानंतर त्याच्यासोबत कोणताही संपर्क केला नाही. मी आणि प्रभाकर जवळपास ३ वर्षे एकत्र राहत होतो. त्याला गोसावीकडे बॉडीगार्डची नोकरी लागल्यानंतर तो निघून गेला. तसेच आम्ही गोसावीला ओळखत नाहीत. त्याने केलेले सर्व आरोप खोटे आहेत.
हेही वाचा - यास्मिन वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात केली तक्रार