मुंबई - म्हाडाची घरे स्वस्तात विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवत 10 लाख रुपयांना चुना लावणाऱ्या बडतर्फ पोलीस कर्मचारी व त्याच्या बनावट म्हाडा एजंटला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रकाश आत्माराम पाडावे व शशिकांत लिंबारे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस सेवेतून बडतर्फ झाल्यानंतरही प्रकाश पाडावे याने, तो म्हाडातील एका मोठ्या अधिकाऱ्याचा बॉडीगार्ड असून म्हाडातील एक एजंट शशिकांत लिंबारे याच्या मदतीने प्रभादेवीत म्हाडाचे घर स्वतात मिळवून देण्याचे आमिष दाखवून पीडित तक्रारदारकडून 10 लाख रुपये उकळले होते. या दरम्यान पीडितेला विश्वास बसावा म्हणून आरोपीने म्हाडा व उपजिल्हाधिकारी, मुलुंड कार्यालयाचे बनावट कागदपत्र बनवून दिले होते. मात्र, पैसे मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल फोन बंद करून ठेवले होते. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विरार परिसरातून दोन मार्चला आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
प्रकाश पाडवे हा मुंबई पोलीस खात्यात 1996 साली शिपाई पदावर भरती झाला होता. त्याने पोलीस सेवेत असतानाही नायगाव शस्त्रागार येथे सरकारी शस्त्र चोरून त्याची बाहेर परस्पर विक्री केली होती. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आरोपीने अशा बऱ्याच प्रकरणात नागरिकांना फसवले असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अटक आरोपीवर मुंबईतल्या पंतनगर, माटुंगा, भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा -
दिल्ली हिंसाचराच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार आक्रमक, संसदेबाहेर आंदोलन
राजू शेट्टी म्हणतात... तर अर्थसंकल्पाबाबत अधिक आनंद झाला असता