मुंबई - न्यायालयाने परमबीर सिंग(Param Bir Singh) यांना फरार घोषित केले आहे. ते देशाबाहेर पळून गेले, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. मात्र, कोणीतरी मदत केल्याशिवाय त्यांना देशाबाहेर पळून जाता येत नाही. अँटिलिया प्रकरणाचा(Antilia Bomb Scare) तपास परमबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली होत होता. मात्र, त्यांच्यावरच याप्रकरणात आरोप होऊ लागल्यानंतर केंद्र सरकारने या बाबतीत लक्ष घालून सिंग देशाबाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Minister Jayant Patil) यांनी दिली आहे.
- कोणाच्या मदतीशिवाय सिंग देशाबाहेर जाऊ शकत नाहीत - जयंत पाटील
कोणी म्हणतं परमबीर सिंग लखनऊला गेले, त्यानंतर नेपाळमार्गे देशाच्या बाहेर गेले. तर आता ते युरोपला वेगळ्या पासपोर्टवर गेले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोणाच्या मदतीशिवाय ते देशाच्या बाहेर जाऊ शकत नाहीत, असे मत मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
- सर्वांना बोलका गृहमंत्री पाहिजे-
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत गेली 30 ते 35 वर्ष सोबत कामाचा अनुभव आहे. ते जास्त बोलत नाहीत. राज्यात काही झालं तरी गृहमंत्र्यांनी बोललं पाहिजे, सर्वांना बोलका गृहमंत्री हवाय. मात्र, गृहमंत्री अतिशय काटेकोरपणे आणि नियमात बसणारे काम करतात. त्यांच्या समोर आलेल्या प्रत्येक प्रश्नांचे ते सखोल अर्जाची सखोल चौकशी करतात, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.